Abhijit Katke: गदाधारी 'हिंद केसरी'चा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान, एवढ्या लाखांचं मिळालं बक्षीस By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:16 PM 2023-01-14T12:16:53+5:30 2023-01-14T12:38:04+5:30
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला.
फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी वर्चस्व राखले आणि हरयाणाच्या सोमविर याला 5-0 अशा गुणांनी पराभूत करत हिंद केसरीच्या खिताबावर नाव कोरले.
अभिजीतच्या विजयानंतर महाराष्ट्राच्या लाल मातीत एकच जल्लोष पाहायला मिळाला. गल्लीपासून कोल्हापूरच्या आखाड्यापर्यंत सर्वांनी अभिजीतच्या हिंद केसरी होण्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं.
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं.
अभिजीत कटके यांनी पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख प्रकाश भानगिरे यांच्यासमवेत मंत्रालयातील दालनात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नमस्कार करत त्याचे स्वागत केले.
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे संपन्न झालेल्या ५१व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंद केसरी किताब पटकावला आहे. त्याने मिळवलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल त्याचे मनापासून कौतुक करीत सन्मान केला.
यावेळी त्याला ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले तर बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश नाना भानगिरे यांनी दिलेल्या २ लाखांच्या बक्षिसाचा धनादेश त्याला सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.
दरम्यान, हिंदी केसरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध संस्था आणि संघटनांकडून अभिजीत कटके याचं अभिनंदन करण्यात येत आहे. लाल मातीतील अनेक वस्तादांकडून त्याला शाबासकी मिळत आहे.
हिंदी केसरीचा खिताब पटकावल्यानंतर अभिजीतने माध्यमांशी बोलताना आपला प्रवासच थोडक्यात उलगडला होता. गेल्या १७ ते १८ वर्षांची मेहनत, कुस्तीतील सातत्य आणि हिंद केसरी स्पर्धेचा एक पराभव आपल्यासोबत होता.
या मेहनतीच्या व अनुभवाच्या जोरावरच आणि कुटुंबीयांसह वस्तादांनी माझ्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळेच अखेर आपण हिंद केसरीचा खिताब पटकावला आहे, असे अभिजीतने माध्यमांशी बोलताना म्हटले.