'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 08:15 AM 2021-09-12T08:15:43+5:30 2021-09-12T10:48:35+5:30
सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने 32 वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली.
गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने जबर जखमी झालेल्या अबलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे 33 तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांना एक महिन्याचा वेळ देण्यात आला असून ज्योत्स्ना रासम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या अनुशंगाने ज्योत्स्ना रासम यांच्याबद्दल जाणून घेऊया.
रासम या 27 वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. आज सहायक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल यशस्वी केली आहे.
भ्रूणहत्येच्या विरोधात 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये 6580 किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने करून फास्टेस्ट वूमन म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या रासम यांची कामगिरी धडाकेबाज आहे.
ज्योत्स्ना रासम यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. यात मुद्रांक घोटाळ्यातील तपास, अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्या प्रकरण, 2011 साली हैदराबादहून मुंबईला तस्करी करण्यात आलेले 1 कोटी 45 लाख किमतीचे हिरे आणि सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीच्या मुसक्या आवळणे, विशेष म्हणजे राणी मुखर्जीला ‘मर्दानी’ चित्रपटासाठी ज्योत्स्ना रासम यांनी ट्रेनिंग दिलं आहे.
रासम यांचे कुटुंब मूळचे राजापूरचे, पण जन्मापासून आतापर्यंतचे आयुष्य मुंबईत गेले. वांद्रे, गांधीनगर परिसरात रहाणाऱ्या ज्योत्स्ना यांचे न्यू इंग्लिश स्कूल, नंतर चेतना महाविद्यालय इथे शिक्षण झाले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची; पण खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत आईवडिलांनी कधीही आबाळ होऊ दिली नाही, असे त्या सांगतात.