Aditya Thackeray: 'रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईला जपणं हे आपलं कर्तव्य' By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:04 PM 2022-11-21T14:04:01+5:30 2022-11-21T14:12:05+5:30
संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात १०७ जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि १ मे १०६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात १०७ जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि १ मे १०६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे झालेल्या विशाल मोर्चाने मोठी ताकद दिली. मराठी माणसांची संयुक्त महाराष्ट्रासाठीची एकजुट होण्यास तोच मोर्चा आणि आजचा दिवस म्हणजे २१ नोव्हेंबर १९५६ हाच दिवस कारणीभूत ठरला.
महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याच्या निर्णयाविरूद्ध आजच्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर १९५६ साली फ्लोरा फांऊटनला मोठा मोर्चा निघाला होता. ज्यावर दडपशाहीने गोळीबार होऊन अनेकांना हौतात्म्य आलं.
रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईला जपणं, संयुक्त महाराष्ट्राचं खच्चीकरण होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे!, अशा शब्दात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या दिवसाची आठवण करुन दिली.
आदित्य यांनी फ्लोरा माऊंटन येथे जमलेल्या गर्दीचा आणि हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाचा फोटो शेअर करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आठवण करुन दिली आहे. सध्या महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव घातल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने होतो.
दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर १९५७ रोजी सकाळपासूनच फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता.
याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता.
दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-दीडशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघणार, असा अंदाज होता.
पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून उत्तुंग घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा होऊ लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती.
सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा निरोप होता. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात येऊ लागला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आले.
मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.