Ram Kadam: "एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जाण्यास आदित्य ठाकरेंचं सरकार कारणीभूत" By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:23 AM 2022-10-28T10:23:37+5:30 2022-10-28T10:32:10+5:30
आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यावरुन, विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, ब्राह्मण महासंघानेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं.
आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यावरुन, विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, ब्राह्मण महासंघानेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आणखी एक प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेला, असा सनसनाटी आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या मुद्यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?
खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही आहे, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे म्हटले आहे.
एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर जायला आदित्य ठाकरे यांचे सरकार कारणीभूत आहे. स्वतः च्या सरकारचे अपयश दुसऱ्याच्या माथी नका मारू जर हिम्मत असेल कागदपत्रे दाखवा, असं आव्हानच कदम यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
सत्ता गेल्याचे दुःख आदित्य ठाकरे अजून पचवू शकले नाही. अन्यथा पुन्हा एकदा खोटे बोललात म्हणून देशाची माफी मागा, असेही राम कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीकडेच बोट दाखवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे, हे यातून स्पष्ट होते.