छट पुजेला बंदी घातल्यानं मुंबईतील कारागिर आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 06:58 PM2020-11-18T18:58:20+5:302020-11-18T19:09:10+5:30

मुंबई महापालिकेने छट पुजेला यंदा बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आधीच लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या हातावर पोट असणाऱ्या कारागिरांना या निर्णयचाही फटका बसणार आहे. मुंबईतील कारागिर छटपुजेसाठी मोठ्या प्रमाणात वस्तू बनवून ठेवतात.

यंदा छटपुजेला परवानगी नसल्याने समुद्रकिनारी, नदीकिनारी किंवा तलावाशेजारी होणारी छटपूजा साजरी होणार नाही. त्यामुळे, कारागिरांच्या वस्तूही कुणी विकत घेणार नाहीत.

छटपूजा बंदीच्या निर्णयावरुन राज्यात राजकारण तापल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी सरकारकडून या निर्णयाचं स्वागत होत असताना, भाजपाने या निर्णयावरुन शिवसेनेला टार्गेट केलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते कोरोना महामारीच्या काळातही धर्माच्या आडून गलिच्छ राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय,वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

आज प्रसारीत केलेल्या एका व्हिडियोत अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांना प्रश्न विचारलेत की, देश कोरोनामुक्त झाला आहे का ? देशातील परिस्थिती सामान्य झाली आहे का? कोरोना विषाणूवर लस निघाली आहे का.? जर या सर्व प्रश्नांचं उत्तर 'नाही' असं असेल तर या महामारीच्या काळात भाजपाचे आपला धार्मिक अजेंडा का चालवत आहेत..? असा सवाल त्यांनी केला.

धर्मावर आधारित घाणेरडं राजकारण करुन भारतीय जनता पार्टीचे नेते नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मुद्द्याच्या आडुन देखील भाजपाने आपला धार्मिक व राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचं काम केलं होतं.

आताही परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता भाजपाचे नेते छटपूजेच्या मुद्द्यावरुन राजकारण करत आहेत अशा टीका त्यांनी केली. कोरोना संक्रमण काळात आलेला प्रत्येक सण सर्व धर्मांच्या लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांततेने व संयमाने साजरा केला.

कोणताही सण साजरा करत असताना कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाला घेणं आवश्यक असतं. छटपूजे संदर्भातला निर्णय देखील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घेण्यात आलेला आहे.