जहाँगीर आर्ट गॅलरीतील कलाविष्कार, लॉकडाऊनला अनुसरुन कलाकृती By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:13 PM 2021-02-16T22:13:02+5:30 2021-02-16T22:33:59+5:30
२२ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन, ३५ पेंटीग्स आणि १ आर्ट इन्स्टॉलेशनचे सादरीकरण. 'द रोलिंग पेंटिंग' मध्ये ५०० हून अधिक पीव्हीसी पाईप्सवर साकारले निसर्गचित्र, एकाच कलाकृतीत १२ पेंटीग्सची पर्वणी देशावर लागू झालेल्या लॉकडाउनला अनुसरून रेखाटली 'लॉकडाउन बाबा' ही अनोखी पेंटिंग लॉकडाउननंतर प्रथमच जहांगीर आर्ट गॅलरी सुरू झाली असून या गॅलरीत 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' विजेते बिभूति अधिकारी यांच्या कलाविष्कारांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १६ फेब्रुवारीपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून २२ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत पाहता येईल.
'निसर्ग, मनुष्य आणि माझ्या देशासाठी सकारात्मक ठरणारे' ही भावना मनाशी ठेवत बिभूति यांनी 'फेथ अँड फ्युरी-अन्विलिंग द एक्सेंट्रिक' या शिर्षकाअंतर्गत ३५ वैविध्यपूर्ण पेंटीग्स आणि १ आर्ट इन्स्टॉलेशन साकारले असून हे सर्व आविष्कार कलारसिकांना भुरळ घालत आहेत. निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारे वर्ल्डस फर्स्ट इनोव्हेटिव्ह पेंटिंग 'द रोलिंग पेंटिंग' या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे.
५९४ पीव्हीसी पाईप्सचा वापर करून 5ft x 4ft उंचीची ही पेंटिंग बनवली आहे. प्रत्येक पीव्हीसी पाईपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली असून विशिष्ट पद्धतीने या पाईप्स रोल केल्यावर तब्बल १२ विविध पेंटीग्स पहायला मिळतात. अशा पद्धतीची पेंटींग कलारसिकांना प्रथमच बघायला मिळत आहे. या प्रदर्शनात देशावर लागू झालेल्या लॉकडाउनला अनुसरून 'लॉकडाउन बाबा' ही अनोखी पेंटिंग पहायला मिळेल.
आर्टिस्ट, स्कल्पचर, कार्टूनिस्ट, कॅरिकेचरिस्ट असणारे बिभूति अधिकारी मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. रंगांची आवड असणाऱ्या बिभूति यांनी डिजिटल, स्ट्रोक्स, ब्रश ते केवळ बोटांचा वापर करत अनेक कला साकारल्या आहेत. सतत काहीतरी नवीन करण्याची जिद्द असणाऱ्या बिभूति यांनी पहिल्यांदाच पीव्हीसी पाईप्सचा वापर करत पेंटिंग बनवण्याचे ठरविले. 'निसर्ग आणि प्राण्यांचे संवर्धन' हा संदेश त्यांना या पेंटिंगच्या माध्यमातून द्यायचा आहे. ''प्रत्येक पीव्हीसी पाईपवर मी निसर्ग, वन्यजीव रेखाटले आहेत.
विशिष्ट पद्धतीने या पाईप्स रोल केल्यावर दरवेळी वेगवेगळी पेंटींग साकार होते. या एकाच पेंटिंगमध्ये १२ विविध पेंटींगचा आनंद घेणे हीच याची सुंदरता आहे. या कलाकृतीसाठी मला 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'द्वारेही पुरस्कार मिळाला असून 'वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी'द्वारे डिसेंबर २०१९ साली मानचिन्ह म्हणून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. माझ्या प्रत्येक कलाकृतीद्वारे एक सकारात्मकतेचा संदेश मला पोहोचवायचा असतो.'' अशा भावना बिभूति अधिकारी यांनी व्यक्त केल्या. मायानगरी मुंबईमध्ये स्वतःचा सोलो शो करण्याचे बिभूति यांचे स्वप्न होते. जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित केल्या गेलेल्या प्रदर्शनाद्वारे त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
या प्रदर्शनामध्ये Winning Horse, The Performer, Cheerharan – Kal bhi Aaj bhi, Act of Kindness, Motherhood, Deedar-e-Elahi, Love Beyond Language, Wild Fire, Manimal या शीर्षकांतर्गत साकारलेली विविध पेंटीग्स सुद्धा पाहता येतील. Cheerharan – Kal bhi Aaj bhi हे पेंटिंग पूर्वी स्त्रियांवर होणाऱ्या शोषणाचे प्रतिकात्मक चित्र आहे.
'ही स्थिती आजही दिसत असून भविष्यातही वाढत जाईल' हा संदेश या पेंटिंगद्वारे पोहचवण्यात आला आहे. Act of Kindness या पेंटिंगद्वारे 'माणुसकी'चा संदेश देण्यात आला असून एक दृष्टिहीन हिंदू पुजारी एका अपंग मुस्लिम वृद्धाला मदत करताना दाखविले आहे. Motherhood हे पेंटिंग प्रत्येक आईला, प्रत्येक स्त्रीला समर्पित आहे. प्रत्येक पेंटींगद्वारे बिभूति यांनी एक सकारात्मक आणि सामाजिक संदेश दिला आहे.
बिभूति यांनी आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली असून त्यांची स्वतःची इव्हेंट्स आणि एक्झिबिशनची कंपनी आहे. डिझाईनिंग, इन्स्टॉलेशनपासून ते प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणाऱ्या परेडमधील भव्य कलाकृती साकारण्यापर्यंतचा बिभूति यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कला स्पर्धांमध्ये भाग घेतला असून पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या एका इनोव्हेटिव्ह पेंटींगला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे.