Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:21 PM 2021-07-20T16:21:30+5:30 2021-07-20T16:35:40+5:30
Ashadhi Ekadashi : मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाकून नमस्कार केला. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारी सामाजिक अंतर मिटू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे.
आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत एसटी पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेशही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
महापुजेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक रुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरें आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आदित्य यांच्या विनम्रतेचं कौतुक होत आहे.
मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाकून नमस्कार केला.
आदित्य यांचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गतवर्षीचाही फोटो व्हायरल होत असून दोन्ही बाप-लेकांच्या संस्कार व विनम्रपणाचं कौतुक होत आहे.