"ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं" By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:35 PM 2023-01-22T17:35:40+5:30 2023-01-22T17:50:10+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं सोमवारी २३ जानेवारी रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेलं आहे.
चार चित्रकारांनी साकारलेल्या बाळासाहेबांच्या चित्रांपैकी चंद्रकला यांच्या चित्राची निवड करण्यात आली. चंद्रकला यांनी आपल्या कलेने चित्रात जिवंतपणा ओतलेल्या या चित्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीत हा तैलचित्र अनावरण सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी, ठाकरे कुटुंबीयांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. तर, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या सोहळ्याचं निमंत्रण आहे. मात्र, उद्या याप्रसंगी कोण उपस्थित राहतील हा प्रश्नच आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे देखील एक चित्रकार असून अनावरण प्रसंगी उपस्थित राहून माझ्यासारख्या चित्रकाराला दाद द्यावी अशी इच्छा चंद्रकला यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी तैलचित्र अनावरण सोहळ्याला उपस्थित राहावे ही इच्छाच चित्रकार चंद्रकला यांनी व्यक्त केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या एकाच फोटोचा आधार घेऊन हे तैलचित्र साकारले आहे. बाळासाहेबांना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब यांनीही माझं काम पाहिलं होतं, त्यांना माझे चित्र काढताना स्ट्रोकस आवडायचे.
बाळासाहेबांनी मला संसदेतील वीर सावरकरांचे तैलचित्र, गुजरातच्या विधानभवनतील तैलचित्र साकारण्याच्या संधी दिल्या. ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिली त्या बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र माझ्या हातून घडतंय याचा मला खूप आनंद आहे, असेही चंद्रकला यांनी म्हटलं.
राष्ट्रीय दर्जाच्या चित्रकार चंद्रकला कुमार कदम यांच्या कुंचल्यातून उमटलेली चित्रे तेजाने वलयांकित होऊन आजवर कलारसिकांच्या मनावर बिंबली. इतकेच नाही तर कधी एक्झिबिशनच्या माध्यमातून ती दूरदूर पोहोचली आहे.
कधी पोट्रेट, रेखाचित्रे, तैलचित्रांच्या माध्यमातून ती घराघरांतच नाहीत तर संसद भवन, गुजरात विधानसभा, नवीन विधान भवन, तर नवी मुंबई महापालिकेमध्येही झळकली. विविध दिवाळी अंक, मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकून ती घराघरांत पोहोचली आणि कलेला दाद मिळवून देणारी ठरली.
पार्लमेंटच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते चंद्रकला कदम यांनी साकारलेले वीर सावरकर यांचे तैलचित्र तसेच गुजरात विधानसभेतील वीर सावरकर यांचे तैलचित्र हे उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या हस्ते लावण्यात आले.
१९८८ साली म. जोतिबा फुले यांच्या चित्राचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी चंद्रकला कदम यांचा सत्कारही करण्यात आला होता.