मध्य रेल्वेचा खेळखंडोबा अन् प्रवाशांचा उद्रेक

By admin | Published: January 2, 2015 12:00 AM2015-01-02T00:00:00+5:302015-01-02T00:00:00+5:30

रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.

अज्ञात व्यक्तींनी पोलिसांच्या गाडीलाच आग लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला.

रेल्वे प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवत प्रवाशांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले नाही. तसेच स्थानकात पुरेसे पोलिस दलही नव्हते. संतप्त जमावाने लोकल गाड्यांवर दगडफेक केली. यात एक मोटरमन किरकोळ जखमी झाला.

धीम्या मार्गावर लोकल ट्रेन नसल्याने दिवा स्थानकावर प्रवासी खोळंबले होते. किमान जलद गाड्यातरी दिवा स्थानकात थांबवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली. मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचा पारा चढला व त्यांनी रुळावर उतरुन आंदोलनाला सुरुवात केली. सव्वा आठच्या सुमारास प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले.

पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अप आणि डाऊन दिशेच्या धीम्या मार्गावरील लोकल ट्रेन जलद मार्गावर वळवण्यात आल्या. ऐन गर्दीच्या वेळी उडालेल्या या गोंधळामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. धीम्या मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना भर थंडीत पायपीट करत डोंबिवली स्थानक गाठले.

नववर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यावर कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांना शुक्रवारी सकाळी मनस्ताप सोसावा लागला. सकाळी पावणे सातच्या सुमारास बदलापूर - सीएसटी लोकलचा ठाकूर्ली ते कोपर स्थानका दरम्यान पेंटाग्राफ तुटला.