मुंबईकरांनो, तुम्हाला बिल देणार शॉक! अदानी, टाटा आणि बेस्टचं रेटकार्ड बघितलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 00:01 IST2025-04-13T23:54:13+5:302025-04-14T00:01:23+5:30

वीज नियमक आयोगाने मंजूर केलेली वीज दरवाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या बिलात ग्राहकांना जादा बिलाचा 'शॉक' बसणार आहे.

अदानी कंपनीची १०१ ते ३०० युनिट, तर 'बेस्ट'च्या ३०१ ते ५०० आणि ५०० हून अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची झळ बसणार आहे.

'टाटा'च्या वीज दरात कपात झाली असली, तरी सध्याच्या उकाड्यात मुंबईकरांनी एसी, कूलर आणि पंखे पुरेपूर वापरल्याने विजेचे मीटरही वेगाने फिरले आहेत. त्यामुळे साहजिकच 'बेस्ट', 'महावितरण', 'टाटा' आणि 'अदानी' या वीज कंपन्यांच्या ग्राहकांना वाढीव बिल येणार आहे.

'अदानी'ची १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ९ रुपये १० पैशांऐवजी ९ रुपये ६३ पैसे मोजावे लागतील.

'बेस्ट'ची ३०१ ते ५०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ११ रुपये ५३ पैशांऐवजी ११ रुपये ९१ पैसे, तर ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना १४ रुपये ११ पैसे मोजावे लागतील.

४ हजार ५०० मेगावॅटवर पोहोचणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी ट्रान्सफॉर्मर, फीडर, केबल्सचे थर्मल स्कॅनिंगद्वारे मॉनिटर केले.

'महावितरण'च्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर दिलेल्या वीज दर कपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे.

त्यामुळे वीज दर निश्चितीचा नवा आदेश येईपर्यंत 'महावितरण'च्या ग्राहकांना जुन्याच दराने वीजबिल भरावे लागणार आहे.

टाटा पॉवरची वीज मागणी १,१०० मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यांची १,६३० मेगावॅटपर्यंत वीज पुरवठा करण्याची तयारी आहे.

तर 'अदानी' कंपनीची २,२०० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याची तयारी असून त्यांनी गेल्यावर्षी २,०८९ मेगावॅट विजेचा पुरवठा केला होता.