CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:33 AM 2022-06-07T11:33:58+5:30 2022-06-07T11:51:55+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले.
सोमवारी 1036 नवीन रुग्ण आढळले. जर आपण गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली तर, 26 फेब्रुवारीनंतर जेव्हा कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले तेव्हा हा उच्चांक आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील 4.25 टक्के आहे, जो 13 फेब्रुवारीनंतरचा जास्तीत जास्त आहे.
सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात म्हणावी की नाही हे सांगणे घाईचे ठरेल. जोपर्यंत कोणताही नवीन व्हेरिएंट येत नाही, तोवर नवीन लाटेची शक्यता खूप कमी असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील व्हायरसची तीव्रता जास्त नसल्याने आणि रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असं सांगितलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोना प्रकरणांमध्ये ही वाढ प्रामुख्याने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 प्रकारांमुळे झाली आहे, जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि संसर्गजन्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतही कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार, पॉझिटिव्ह रूग्णांपैकी केवळ 1 टक्के रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.
मुंबईत 24,579 बेड आहेत, त्यापैकी सोमवारी फक्त 185 म्हणजेच 0.74 टक्के भरले. ऑक्सिजन सुविधा असलेल्या 4768 बेडपैकी केवळ 14 (0.29 टक्के) रुग्ण होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
राजेश टोपे म्हणाले की, सोमवारी मुंबईत 676 नवीन रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60-70 टक्के रुग्ण हे मुंबईतच आढळून येत आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांत मुंबई (67.287%), ठाणे (17.17%), पुणे (7.42%), रायगड (3.36%) आणि पालघर (2%) टक्के रुग्ण आढळले आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3 ते 8 टक्क्यांपर्यंत आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये किती BA.4 आणि BA.5 Omicron प्रकरणे आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही. या दोन व्हेरिएटंमुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये कोरोनाची नवी लाट येत आहे. हे अधिक सांसर्गिक आहे असे शास्त्रज्ञ मानतात याचे एक कारण हे आहे की ते शरीरात उपस्थित अँटीबॉडीजपासून बचाव करण्यात अधिक पटाईत आहे.
ही वाढती प्रकरणे कोरोनाच्या चौथ्या लाटेचे लक्षण आहेत का? यावर तज्ज्ञांनी भारतातील बहुतांश लोकांमध्ये Omicron च्या BA.2 प्रकारामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, जी अजूनही कार्यरत आहे. ओमायक्रॉनचा प्रसार नक्कीच जास्त आहे मात्र त्याच्या रुग्णांची स्थिती कमी गंभीर होते असं म्हटलं आहे.
एचटी नुसार, महाराष्ट्रातील सर्विलान्स अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. सध्या वाढणारी कोरोना प्रकरणे ही तिसरी लाट आणणाऱ्या ओमायक्रॉनचे सर्व प्रकार आहेत. पुढील काही आठवडे केसेस वाढतील, मात्र नंतर ते कमी होऊ लागतील.
राज्य कोविड टास्क फोर्सचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, सध्या बहुतेक प्रकरणे अतिशय सौम्य आहेत. याला चौथी लाट म्हणणं खूप घाईचे आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालून लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या आठवड्यात राज्य टास्क फोर्सने मास्क अनिवार्य करण्याचा सल्ला दिला होता. 1 एप्रिलपासून राज्यात मास्कसह काही निर्बंध उठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा काळजी घ्या, सावध राहा असं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.