Coronavirus: लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यापासून मुंबईत अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय? By प्रविण मरगळे | Published: February 12, 2021 03:35 PM 2021-02-12T15:35:06+5:30 2021-02-12T15:41:09+5:30
Mumbai Local Service Resumption for common people: गेल्या १ फेब्रुवारीपासून मुंबईत ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. देशात अन् राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यामुळे आता हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत आहे, मागील ११ महिने बंद असलेल्या लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी काही अटींवर खुली करण्यात आली, मर्यादित वेळा देऊन सर्वसामान्य लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली, १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल सुरु करण्यात आली आहे.
पण मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय का? तर लोकल सेवा सुरु झाल्यापासून १५ दिवसांची आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु मुंबईत कोरोना(Corona Patient) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोकलमधील प्रवाशांची वाढती गर्दी याला जबाबदार आहे याबाबत अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत
१० फेब्रुवारीला मुंबईत ५५८ कोरोना रुग्ण आढळून आले तर सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ३६९ असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ११, ४०० मृत्यूचा आकडा नोंदवला आहे. ९ फेब्रुवारीला ३७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ मृत्यू झाले होते, अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या आकडेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही. १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. तेव्हापासून दिवसाला ३० लाखांहून अधिक लोक उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत आहेत.
सध्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर रांगा लागलेले फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनेकांची याबाबत तक्रार आहे की, याठिकाणी कोणतंही सोशल डिस्टेंसिंगचं पालन केले जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाइफलाईन सुरु करण्याचा निर्णय मुंबईकरांसाठी नवं संकट घेऊन येण्याची शक्यता आहे.
आता १० दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीकडे सर्वांचे लक्ष जात आहे. तज्ज्ञांच्या मते रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला लोकल ट्रेनमधील गर्दीला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, काहींच्या मते, आठवड्याच्या शेवटी चाचणीची संख्या कमी होते आणि आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा चाचणी वाढते.
त्यामुळे १५ दिवसांचा रिपोर्ट पाहिल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहचणं कठीण आहे, लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय योग्य होता की नाही यासाठी १५ दिवस पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल, त्यानंतर आकड्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.
तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे लोकल ट्रेनमधील गर्दीचा फॅक्टर दुर्लक्ष करता येत नाही. जसलोक हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ ओम श्रीवास्तव म्हणतात की, जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर त्यामागे लोकल ट्रेनमधील गर्दीशिवाय अन्यही घटक असू शकतात. जगातील बऱ्याच भागात रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सतर्क आणि सावधानता बाळगणं गरजेचे आहे.
मागील वर्षीच्या सुरुवातीच्या काळात आपण जे पाहिलं त्यापेक्षा आताची परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे सध्याचे आकडे पाहिले तर अनेक घटकांमुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यातील लोकल ट्रेन हा एक घटक असू शकतो,
सध्या सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येतो. म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येत नाही.