अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील आगीत 6 रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:48 PM2018-12-17T21:48:59+5:302018-12-17T21:54:10+5:30

अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे.

रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे.

रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या बचाव कार्यादरम्यान 2 रुग्णांचा आणि उपचारादरम्यान रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाचा १ जवान आणि 147 रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असून माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

आगीमुळे रुग्णालयातच्या चौथ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास होत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने इमारतीबाहेर काढले आहे.

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, नेमकी आग कशामुळे लागली हे कळालेले नाही.

१० रुग्णांना कूपर रुग्णालय, ३ रुग्णांना ट्रॉमा आणि १५ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर बघ्यांनी गर्दी केल्याने मदतकार्यात आणि आग विझविण्याचा कार्यात व्यत्यय येत होता.