Devendra Fadanvis: नवाब मलिक राजीनामा द्या, भाजपचा 'धडक मोर्चा' छायाचित्रातून By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:35 PM 2022-03-09T21:35:42+5:30 2022-03-09T21:46:39+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तर, मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनात आक्रमक झाल्याचंही दिसून आले. नवाब मलिक(Nawab Malik) आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर ही होती. या पैशाचा वापर मुंबईत ३ बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातला मंत्री मदत करतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
फडणवीस हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नवाब मलिका यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेतही त्यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भाजपकडून आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा विधानभवनाकडे जात असताना पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना रस्त्यातच थांबवलं. त्यानंतर, काहींना यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
पोलीस व्हॅनमधून फडणवीसांना पोलीस ठाण्यात नेत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केली. शिवसेनेचे हिंदुत्व आता केवळ डायलॉगबाजीपुरते उरले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांनी आजच्या मोर्चासाठी जमलेली गर्दी आणि मोर्चाचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला आहे.
मुंबईतील या भव्य मोर्चाने महाविकास आघाडी सरकारला आम्ही इशारा दिला आहे. सरकारने आताही राजीनामा घेतला नाही, तर हा संघर्ष आणखी तीव्र करण्यात येईल, हा केवळ प्रारंभ आहे, असे फडणवीस यांनी फोटो शेअर करताना म्हटले आहे.
मुंबईतील या धडक मोर्चाला मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच, नवाब मलिक हटवा, महाराष्ट्र वाचवा... नवाब मलिक राजीनामा द्या... असे स्लोगनही येथे झळकले.
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तर, मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनात आक्रमक झाल्याचंही दिसून आले.