चला, मुंबईतील किल्ले पाहू या...! दिवाळीच्या सुट्टीसाठी मस्त प्लान By सचिन लुंगसे | Published: November 13, 2023 02:12 PM 2023-11-13T14:12:10+5:30 2023-11-13T16:05:15+5:30
सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट असे अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग काम करतो. दिवाळीशी किल्ल्यांचे अनोखे नाते आहे. त्यामुळे मुंबईतील किल्ल्यांना दिवाळीच्या सुटीत नक्कीच भेट देता येईल. इतिहास जपला पाहिजे मुंबईतील किल्ले, पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत. त्याचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणून अनेक अभ्यासक कार्यरत असून त्यापैकी अखिल भारतीय मराठा महासंघ गडकिल्ले संवर्धन समितीचे मुंबई शहर अध्यक्ष आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन चंदन विचारे हे वास्तूंच्या संवर्धनासाठी शासनासोबतच्या अनेक उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत.
वांद्रे किल्ला माहीम खाडीमार्गे चालणाऱ्या जल व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिजांनी १६४० साली साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भुशीरावर वांद्र्याचा किल्ला बांधला. प्रवेशद्वारावर पोर्तुगीज शिलालेख आहे. पुरातत्व खात्याने किल्ल्याची डागडुजी केली आहे. तेथे उद्यानही आहे.
सेंट जॉर्ज किल्ला सेंट जॉर्ज इस्पितळाच्या जागेत हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला. किल्ल्याच्या भिंती पोर्तुगीज धाटणीप्रमाणे उतार असलेल्या होत्या. किल्ल्यात कमानी आणि तळघरयुक्त वास्तू होत्या. १८६२-१८६५ च्या सुमारास सर बार्टर फ्रियर याने हा किल्ला पाडून टाकला. आता जी वास्तू आपण किल्ल्याचा भाग म्हणून पाहतो ती पूर्वी दारुगोळ्याचे कोठार होती. येथे पुरातत्व व वास्तू संग्रहालय संचालनालयाचे कार्यालय आहे.
काळा किल्ला १७३७ मध्ये तत्कालीन गव्हर्नर यांनी मिठी नदी काठी पोर्तुगीजांच्या सालशेत बेटावर आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी किल्ला बांधला. काळ्या दगडातील हा किल्ला काळा किल्ला नावाने ओळखला जातो. पुरातत्व खात्यातर्फे किल्ल्याची डागडुजी सुरू आहे.
शीवचा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियर याने हा किल्ला बांधला. किल्ल्यावर २ तोफा आहेत. पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. किल्ल्यात तटबंदी, बुरुज, दारुकोठाराची खोली, चौकोनी हौद या वास्तू पाहायला मिळतात. १६९० च्या सुमारास येथे ३२ शिपाई, २ कार्पोरल्स आणि १ कमांडर असल्याचे कळते.
शिवडीचा किल्ला १६८० साली शिवडी किल्ला बांधण्यात आला. १७६८ साली किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली. किल्लाचा वापर काहीकाळ इंग्रजांनी तुरुंगासारखा केला व नंतर गोदाम म्हणून करण्यात आला. १६८९ च्या नोंदीनुसार किल्ल्यावर ५० शिपाई, १ सरदार आणि १० तोफा असल्याचे कळते. किल्ल्याची तटबंदी मजूबत असून आत बुरुज आणि गोदामाच्या इमारती पाहावयास मिळतात.
माहीम किल्ला १९४० मध्ये प्रताप बिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला. राजधानी येथे वसवली. कालांतराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर जेरॉल्ड ऑगियर (इंग्रज स्थापत्यकार) याने नव्याने बांधकाम केले. किल्ल्यावर पूर्वी ३० तोफा होत्या असं सांगितलं जातं. आधी अतिक्रमाणामुळे किल्ल्यात जाता येत नव्हते परंतु आता अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे किल्ल्यात जाता येते. या किल्ल्याच्या नोंदीबाबत मतमतांतरे आहेत.
वरळी किल्ला इंग्रजांनी १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला, वरळीच्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला माहीम खाडीकडे लक्ष देण्यासाठी बांधण्यात आला होता. त्यावेळी शहर फक्त सात बेटांनी बनलेले होते. याचा उपयोग शत्रूची जहाजे आणि समुद्री चाच्यांना शोधण्यासाठी केला जात असे. वरळी किल्ल्यावर विहीर, मंदिर आणि माहीम, वांद्रेचे दृश्य पाहता येईल अशी भरपूर जागा आहे. हा किल्ला माहीमच्या खाडीच्या विरुद्ध दिशेला आहे.