Ganpati Festival: महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षानंतर बनवले गणपती, ७ जणांना पुरस्कार By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:55 PM 2022-08-27T18:55:36+5:30 2022-08-27T19:17:14+5:30
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून लवकरच त्यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून लवकरच त्यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत संगीत व कला अकादमी कला विभागाच्या वतीने दरवर्षी श्री गणेशमूर्ती मातीकाम विद्यार्थी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. मात्र, कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे कार्यशाळा आयोजनामध्ये खंड पडला होता. यंदापासून हा उपक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ६ ठिकाणी केंद्रस्तरावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये पश्चिम उपनगरात कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पूर्व); पूर्व उपनगरात घाटकोपर, कुर्ला तर शहर विभागात फोर्ट व लोअर परळ येथील महानगरपालिका शाळांमध्ये कार्यशाळेचे आयोजन दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळांमध्ये मिळून एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. त्यातून निवडक प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण ३० विद्यार्थ्यांची मध्यवर्ती स्तर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली
दिनांक २६ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती कार्यशाळेचे आयोजन लोअर परळ येथे ना. म. जोशी महानगरपालिका शाळेत करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आपल्या संकल्पनेतून विविध रूपात श्री गणेशाचे रूप साकारले. पर्यावरण संतुलित व समृद्ध ठेवण्यासह जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून महानगरपालिका विद्यार्थी एकप्रकारे पर्यावरण दूत बनून कलागुण सादर करत असल्याच्या भावना विविध मान्यवरांनी या कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केल्या
सुप्रसिद्ध मूर्तिकार उदय डावल यांनी उत्कृष्ट सात बाल मूर्तिकारांची याप्रसंगी निवड केली. अंतिम विजेत्या ठरलेल्या या बालमूर्तीकारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करुन लवकरच समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. या विजेत्या बाल मूर्तिकारांमध्ये प्रथम पारितोषिक - अक्षरा अजय वर्मा (वरळी सी फेस महानगरपालिका इंग्रजी शाळा), द्वितीय पारितोषिक - रागणी चंद्रमोहन जैसवार (धारावी एमपीएस काळा किल्ला महानगरपालिका शाळा), तृतीय पारितोषिक - ज्योती जयराम महतो (न्यू वर्सोवा हिंदी महानगरपालिका शाळा) यांना जाहीर करण्यात आले आहे.
तर, उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांमध्ये वेदांत विलास सोनवणे (वरळी सी फेस महानगरपालिका इंग्रजी शाळा), आर्यन अरुण गिरी (हनुमान नगर महानगरपालिका हिंदी शाळा), रिया राजेश यादव (हनुमान नगर महानगरपालिका हिंदी शाळा), शुभम लालबहादूर बिंद (तिरंदाज व्हिलेज महानगरपालिका हिंदी शाळा) या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्र स्तर व मध्यवर्ती स्तरावर सहभागी झालेल्या बालमूर्तीकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (शहर) कीर्तीवर्धन किरतकुडवे, अधीक्षिका (शाळा) श्रीमती सायली सुर्वे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्रीमती तनुजा उघाडे व इतर मान्यवरांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कला प्राचार्य दिनकर पवार व कला निदेशक श्रीमती मंजिरी राऊत, भूषण उदगीरकर, योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख व कलाशिक्षकांनी या कार्यशाळांचे संयोजन केले.