मला न्याय मिळावा, कंगनाने घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 09:43 PM2020-09-13T21:43:11+5:302020-09-13T22:06:56+5:30

कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, संसदीय अधिवेशनावर आता आमचं लक्ष आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

दुसरीकडे कंगनाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली असून माझ्यावर अन्याय झाल्याचं सांगत बीएमसीच्या कारवाईची व्यथा राज्यपाल यांच्यापुढे मांडली.

कंगनाने बहिण रंगोलीसह राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली, मी माझी बाजू राज्यपाल यांना समजावून सांगितली. तसेच मला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनंती त्यांच्याकडे केल्याचे कंगनाने म्हटले.

राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: महिलांचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, म्हणून मला न्याय मिळावा, असेही कंगना म्हणाली.

कंगना मुंबईत येणार त्याचदिवशी बीएमसीच्यावतीने कंगनाच्या कार्यालयावर हातोडा फिरवण्यात आला होता. त्यानंतर, कंगनाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्यांच्यावर टीका केली.

कंगना व शिवसेना वादात भाजपा नेत्यांनी कंगनाची बाजू घेत, शिवसेनेवर गुंडागर्दी व ठोकशाहीचा आरोप केला आहे. तसेच, कंगनावरील कारवाई चुकीची असल्याचेही म्हटले.

रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तसेच, राज्यपालांशी बोलून कंगनाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासनही आठवलेंनी दिले होते.

शिवसैनिकांनी मुंबईत एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

कंगना आणि शिवसेना वाद संपला असतानाच शिवसैनिकांनी निवृत्त नेव्हल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे, पुन्हा एकदा कंगनाचा व शिवसेनेचा विषय चर्चेचा विषय बनला आहे.

शिवसेनेकडून कंगना हा विषय आमच्यासाठी संपल्याचं सांगण्यात आलंय. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आज फेसबुक लाईव्हमध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव असल्याचं म्हटलं.