आयएनएस विराटचा अखेरचा प्रवास, मुंबईहून अलंग बंदराकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 15:56 IST2020-09-19T15:48:18+5:302020-09-19T15:56:10+5:30
विराट युद्धनौका युद्धस्मारकात रूपांतरित करण्याचे सारे प्रयत्न फोल ठरल्याने भंगारात काढली जाणार आहे. विराटला गुजरातमधील अलंग या जहाज तोडणी बंदरात नेले जाणार आहे.

भारतीय नौदलात तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट आज अखेरच्या जलप्रवासाठी मुंबईतील नौदलाच्या तळाबाहेर पडली.
विराट युद्धनौका युद्धस्मारकात रूपांतरित करण्याचे सारे प्रयत्न फौल ठरल्याने भंगारात काढली जाणार आहे. विराटला गुजरातमधील अलंग या जहाज तोडणी बंदरात नेले जाणार आहे.
ब्रिटिश आणि भारतीय नौदलात सेवा देणारी, सर्वाधिक काळ सेवेत असलेली युद्धनौका असा विराटचा लौकीक होता. १९५९ साली ब्रिटिश नौदलात दाखल झालेली ही युद्धनौका १९८६ साली भारताने खरेदी केली.
त्यानंतर साधारण तीस वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ६ मार्च २०१७ साली आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली होती. तेव्हापासून विराट मुंबईतील नौदलाच्या तळावर उभी होती.
स्मारकावर नौदलाच्या उच्च परंपरा आणि प्रतिष्ठांची जपणूक होईलच, याबाबत शंका असल्याने नौदलाने याबाबत उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे अखेर विराटला भंगारात काढण्याचा निर्णय झाला. केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनने निविदा प्रक्रियेद्वारे श्रीराम ग्रुप या खासगी कंपनीला विराटचे भंगार देण्याचा निर्णय झाला. श्रीराम ग्रुपने यासाठी ३८.५४ कोटी मोजले.
युद्धनौकेवरील उच्च प्रतीचे स्टील, बुलेटप्रुफ सामान आणि अन्य सुट्या धातूंना मोठी मागणी असते. विशेषतः दुचाकी वाहनांत त्याचा वापर होतो. यापूर्वी, भंगारात निघालेल्या आयएनएस विक्रांतच्या स्टीलच्या नावावर एक दुचाकी गाडीसुद्धा भारतीय कंपनीने बाजारात आणली होती.