मेट्रोच्या प्रवाशांना विमा कवच; बरे-वाईट झाले, तर मिळेल भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:35 PM2023-05-30T12:35:36+5:302023-05-30T12:42:14+5:30

मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मेट्रो मार्ग २ अ आणि ७ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासी विमा कवच लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी महा मुंबई मेट्रोमार्फत देण्यात येणार आहे.

अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त १ लाख तर बाह्यरुग्णांसाठी १० हजारांपर्यंतची भरपाई मिळेल. बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणाव्यतिरिक्त खर्च कमाल १० हजारांपर्यंत. किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त ९० हजार रुपयांची भरपाई मिळेल.

ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी ही पॉलिसी लागू असेल. पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर (कॉनकोर्स आणि फलाट )अशा सर्व ठिकाणी वैध असेल यांनाच भरपाई मिळणार आहे.

याशिवाय मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचे संरक्षण त्या व्यक्तीला लागू होणार नाही.

अपघातांदरम्यान मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, कायमच किंवा अंशिक अपंगत्व आल्यास ४ लाखांपर्यंत भरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकेल.

मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आहेच. पण सर्व सुरक्षा उपायांव्यतिरिक्त अनपेक्षित उद्भवलेल्या परिस्थितीत प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही गरजेचे होते. म्हणून विमा संरक्षण प्रदान करत आहोत. हे विमा कवच लागू केल्यामुळे दुर्दैवी घटनेच्या बाबतीत पुरेसे विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती महा मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.