लाल वादळ मुंबईच्या वेशीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 16:48 IST2018-03-10T16:48:13+5:302018-03-10T16:48:13+5:30

कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला.
समदु:खाने पोळलेल्या पालघर, ठाणे, अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्य़ांतील सुमारे तीस हजार शेतीधारकांचा जथ्था गेल्या पाच दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी तळपत्या उन्हात यात्रासंघर्ष करीत आहे.
१२ मार्चला विधानभवनाला घेराव घालून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारला साकडे घालणार आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दाखल झालेले शेतकरी गटागटाने या मोर्चाचे नियोजन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या गटप्रमुखांकडून रात्री पुढच्या प्रवासाच्या सूचना दिल्या जात आहेत.
पहाटे पाच वाजता मुक्काम स्थळावरून मुंबईच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात केल्यावर तब्बल तीस ते पस्तीस किमी अंतर पार केल्यावर हजारो शेतकऱ्यांचा ताफा भोजनासाठी निश्चितस्थळी थांबतो.
प्रत्येकाच्या आर्थिक वकुबानुसार शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच शिधा, सरपण जमा केले आहे. गेले पाच दिवस खिचडी, डाळ-भात असे साधे जेवण करून हा जथा मुंबईच्या दिशेने निघाला आहेत.