कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लॉकडाऊन राहणार की हटणार? राज्यांचा मूड काय सांगतो? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 04:50 PM 2021-05-22T16:50:03+5:30 2021-05-22T16:56:06+5:30
कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. देशात नेमकं कोणत्या राज्यांमध्ये निर्बंधांबाबत काय विचार सुरू आहे हे आपण जाणून घेऊयात... केंद्र सरकारने गेल्या वर्षी २५ मार्च ते ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला होता. त्यानंतर १ जूनपासून टप्प्याटप्यात अनलॉक की प्रक्रिया सुरू झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. याशिवाय राज्य सरकारांना स्थानिक पातळीवर आवश्यक असे निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आता स्पष्ट शब्दांत लॉकडाऊन जास्त काळ ठेवणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे. मध्य प्रदेशात 1 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दिल्लीत लॉकडाउनमध्ये सूट देण्याच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्यात बैठक होणार आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. दरम्यान, दिल्लीत आजही 3,000 हून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यात काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीत आणखी एका आठवड्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला जाऊ शकतो. सध्या उत्तर प्रदेशात २४ मेपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत अंशत: कर्फ्यूची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही १ जूनपासून निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्याबाबतचे संकेत दिले आहेत. कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील उच्चस्तरिय बैठकीनंतर याबाबतचा निर्णय़ जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. राज्यात आता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आहे, पण पहिल्या लाटेनंतर सरकारला काही धडे मिळाले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय अतिशय विचारपूर्वकच घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
बिहारमध्येही लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची घोषणा नितीश कुमार सरकार करू शकतं. राज्यात ५ मेनंतर लॉकडाऊन लागू आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पण आवश्यक असे नियंत्रण मिळविण्यात आलेलं नाही. त्यामुळे सूट दिली गेल्यास रुग्णांचा विस्फोट होऊ शकतो, असं सरकारचं म्हणणं आहे.
राजस्थानमध्ये ३१ किंवा १० जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी एक कॅबिनेट बैठक होणार आहे. यात महत्वाचा निर्णय होऊ शकतो. दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी याआधीच लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
तामिळनाडूमध्ये तर लॉकडाऊनमध्ये आठवडाभराची वाढ करण्याचा निर्णय याआधीच जाहीर करण्यात आला आहे. १० मेपासून तामिळनाडूत पूर्णपणे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संदर्भात घेण्यात आलेल्या नियमांमध्ये कोणतेही बदल किंवा सूट न देता लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढविण्यात आला आहे.
केरळमध्येही ३० मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्यात ३० हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले. केरळमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तब्बल २३.१८ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात येत्या काळात निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार नाही.
कर्नाटकमध्ये ७ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी लॉकडाऊन वाढविण्याबाबतची घोषणा केली. कर्नाटकमध्येही १० मेपासूनच लॉकडाऊन सुरू आहे. सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट न देता लॉकडाऊन ७ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये सध्या ५ लाखाहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यात एकट्या बंगळुरूमध्ये ३ लाख रुग्ण आहेत.