मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:00 PM2024-11-07T19:00:13+5:302024-11-07T19:51:52+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे २ गट आमने-सामने आले आहेत. त्यात मुंबईतल्या ३६ जागांपैकी २२ जागांवर उद्धव ठाकरेंनी तर १४ जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार उतरवले आहेत. त्यात ११ मतदारसंघात ठाकरेसेना आणि शिंदेसेना एकमेकांना भिडणार आहे. या ११ जागा कोणत्या? - भायखळा, वरळी, माहिम, चेंबूर, भांडुप पश्चिम, कुर्ला, अंधेरी पूर्व, दिंडोशी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, विक्रोळी असे मुंबई शहर आणि उपनगरातील हे मतदारसंघ आहेत. जिथे शिवसेनेच्या दोन्ही गटात थेट लढत आहे. (माहिती सौजन्य: अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत मुंबई)

वरळी मतदारसंघात दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार मिलिंद देवरा यांना तिकिट देण्यात आले आहे. त्याशिवाय मनसेनेही संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी दिली आहे.

मागाठाणे मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. शिंदेंच्या बंडानंतर प्रकाश सुर्वे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आता या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुख उदेश पाटेकर यांना तिकिट दिले आहे.

विक्रोळी मतदारसंघात संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांना ठाकरे गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवर्णा करंजे यांना उमेदवारी दिली आहे.

भांडुप पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार रमेश कोपरगावकर यांना ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. रमेश कोरगावकर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार अशोक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जोगेश्वरी मतदारसंघात रवींद्र वायकर हे अलीकडेच खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांच्या जागी जोगेश्वरीत एकनाथ शिंदेंकडून वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी नगरसेवक अनंत नर यांना उमेदवारी मिळाली आहे.

दिंडोशी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील प्रभू यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे तर त्यांच्याविरोधात माजी खासदार संजय निरुपम हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अंधेरी पूर्व मतदारसंघात आमदार ऋतुजा लटके यांना ठाकरेंकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके पोटनिवडणकीत विजयी झाल्या होत्या. मात्र यंदा या मतदारसंघात भाजपाकडून शिंदे गटात प्रवेश केलेले मुरजी पटेल यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे.

चेंबूर मतदारसंघात उद्धव ठाकरेंकडून विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांना निवडणुकीची उमेदवारी दिली आहे तर याच मतदारसंघात माजी आमदार राहिलेले तुकाराम काते यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी दिली आहे.

कुर्ला मतदारसंघात मंगेश कुडाळकर हे विद्यमान आमदार असून ते एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यांना शिंदेंनी पुन्हा उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघात प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिली आहे.

माहिम मतदारसंघ याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शिंदेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे मनसेकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे.

भायखळ्यात यामिनी जाधव या विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा उमेदवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळाली आहे तर उद्धव ठाकरेंकडून या मतदारसंघात मनोज जामसुतकर यांना तिकीट देण्यात आले आहे.