Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:43 AM 2021-05-27T10:43:48+5:30 2021-05-27T10:53:48+5:30
Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. येत्या १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊन उठवणार की आणकी लांबणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज्य सरकारकडून मात्र एकदम लाॅकडाऊन उठविणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसह राज्यात किमान पन्नास टक्के नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण होत नाही तोपर्यंत लाॅकडाऊन पूर्णपणे हटविणे धोक्याचे ठरणार असल्याचे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मुंबई आणि राज्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठवणे हे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवणे गरजेचे आहे. सलून, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, कपडे आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सुरुवातीला उघडावीत. त्यानंतर बाकीची दुकाने आणि इतर दैनंदिन व्यवहार सुरू व्हावेत, असे मत अस्लम शेख यांनी मांडले.
विविध व्यापारी संघटनांनीसुद्धा १ जूननंतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करत दररोज किमान आठ तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार, निर्बंध शिथील होणार याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाऊनबाबत राज्य सरकार सध्या दोन प्रस्तावांचा विचार करत असल्याचं समजतं. पहिला प्रस्ताव म्हणजे 1 किंवा 7 जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करणं. परंतु राज्यातील अनलॉक प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडेल, असंही म्हटलं जात आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याचीही माहिती समोर येत आहे.
पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं सुरु होऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया 1 जूनपासून करायची की 7 जूनपासून याबाबतचा अंतिम आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकानं सुरु करण्याची परवानगी दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल, असं समजतं. मात्र ही दुकानं दिवसाआड सुरु राहतील.
अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, मद्याची दुकानं निर्बंधासह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. हॉटेलांना 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळू शकते.मात्र शाळा आणि महाविद्यालये तूर्तास बंद राहतील. तर मुंबई लोकल गाड्या अनलॉकच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात पुन्हा सुरु होऊ शकतील असं कळतं.
दरम्यान, राज्यात दिवसभरात २३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आतापर्यंत एकूण ५२,४१,८३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २४,७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४५३ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,५०,९०७ झाली असून मृतांचा आकडा ९१ हजार ३४१ आहे.