मुंबईच्या पोटात 'मावळ्या'ची दमदार कामगिरी; कोस्टल रोडसाठीचे महाकाय बोगदे पाहिलेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 04:34 PM 2021-03-02T16:34:18+5:30 2021-03-02T16:51:11+5:30
मुंबई महानगरपालिकेचा अन् पर्यायानं शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या कोस्टल रोडसाठी 'मावळा' नावांचं अजस्त्र संयंत्र मुंबईच्या पोटात भलेमोठे बोगदे तयार करतंय. कोस्टल रोड प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राद्वारे सुरू आहे. बोगद्याचे १०० मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडसाठीचा बोगदा हा सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा ठरणार आहे.
सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत.
'मावळा' या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे.
बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येणार आहेत. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत.
बोगदे खणण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या 'मावळा' या टनेल बोरिंग मशीनचा व्यास तब्बल 12.9 मीटर इतका आहे. हे संयंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे.
दोन्ही महाबोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर असणार आहे.