ऑनलाइन लोकमतमुंबई, दि, 12- मुंबईतील मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. मुंबई मेट्रोकडून कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. मेट्रोचं परतीच्या प्रवासाचं तिकीट 5 रूपयांनी महाग झालं आहे. मेट्रोच्या परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि पासच्या दरात अडीच वर्षांनी वाढ केल्याचं मेट्रोकडून सांगितलं जातं आहे. मेट्रोच्या 2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी 2015मध्ये मेट्रोकडून दरवाढ कऱण्यात आली होती. घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ४५ रुपये मोजावे लागत होते. तर घाटकोपर ते अंधेरी प्रवासासाठी ३५ रुपये मोजावे लागत होते.दोन टप्प्यात असलेला मासिक पास ६७५ रुपयांवरुन ७२५ रुपये झाला होता, तर ९०० रुपयांचा पास ९५० रुपये झाला होता.