"मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?" By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:15 PM 2022-08-17T12:15:20+5:30 2022-08-17T12:34:50+5:30
आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने धडक कारवाई करत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर मोठे गंभीर आरोप करत घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. आताच्या घडीला अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू असून, पुढचा नंबर अनिल परबांचा असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच ईडीच्या कारवाईसंदर्भात ट्विट करत असतात. ईडीच्या कारवाई होण्यापूर्वीच ते पुढचा नंबर कोणाचा याचं भाकीतही वर्तवितात, विशेष म्हणजे अनेकदा मोहित कंबोजने वर्तवलेलं भाकीत खरंही ठरलं आहे. त्यावरुनच, आता विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत.
कारण, आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे.
कंबोज यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मोहित कंबोज कुणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कंबोजला ईडीच्या कारवाईपूर्वीच माहिती कशी मिळते, हे संशयास्पद आहे, असे मिटकरी यांनी म्हटलं आहे.
मोहित कंबोजने ट्विट करुन अनिल देशमुख यांच्यानंतर कोणाचा नंबर हे सांगितलंय, यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मोहित कंबोज आहे कोण? त्याला इतकं महत्त्व भेटतं, मी स्पष्ट सांगतो. लष्कर ए देवेंद्रमधला तिसऱ्या फळीतला हा नेता आहे.
हा भाजपचा भोंगा आहे, याने कालपरवा भोंगे वाटले. मोहित कंबोजने ईडीच्या दारात बसून ही माहिती मिळवली आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
मोहित कंबोज जीएसटीवर बोलत नाही, तो शेतकऱ्यांवर बोलत नाही, तो महिलांवरील अत्याचारासंदर्भात बोलत नाही. पण, ईडी कोणाच्याघरी कशीकशी धाड टाकेल हे मोहित कंबोज ट्विट करुन सांगत असेल तर निश्चितच हे संशयास्पद आहे.
मोहित कंबोजला ही माहिती मिळतेच कशी?. मोहित कंबोज हा कोणाचा माणूस आहे, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे, असा सवालही मिटकरी यांनी विचारला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संबंधित नेत्याविषयी तपास यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले.