मुंबई भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढलं; सर्व्हेमुळे पक्षनेतृत्व घेणार मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:19 AM2022-09-12T10:19:58+5:302022-09-12T10:23:51+5:30

आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसोबतच भाजपानेही प्रतिष्ठेची केली आहे. यंदा महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा असा निर्धार भाजपानं केला आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक चुरशीची होणार असून त्यात कुठला पक्ष बाजी मारतो हे पाहणं गरजेचे आहे.

२०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यात शिवसेना विरुद्ध भाजप अशा थेट लढतीत ६२ ठिकाणी भाजप तर ४३ ठिकाणी शिवसेना जिंकली होती.

बदलत्या राजकीय परिस्थितीत एकट्या पडलेल्या शिवसेनेला आहे त्या ८४ जागा टिकवणे व दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर यश मिळवावे लागेल. भाजपला जिंकलेल्या ८२ जागा टिकवणे आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या ५८ जागांपैकी किमान ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे.

परंतु तत्पूर्वी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमुळे मुंबईतील नगरसेवकांचे टेन्शन वाढलं आहे. एकूण नगरसेवकांपैकी ५० टक्के नगरसेवक अकार्यक्षम असल्याचा ठपका सर्व्हेत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे.

आगामी महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपानं सर्व्हे केला होता. त्यात ५० टक्के नगरसेवकांच्या मतदारसंघात त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत ५० टक्के नगरसेवकांना पत्ता कट होण्याचीही शक्यता जास्त आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने झी-२४ तासनं दिलीय.

मुंबई महापालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवावी असे भाजपला वाटत असले तरी, लढाई तेवढी सोपी नाही. मराठी मतांचे विभाजन, ठाकरे सेनेला सहानुभूती मिळू न देणे, मतांची काटछाट करण्यासाठी राज ठाकरेंचा उपयोग, या गोष्टी भाजपला अत्यंत चलाखीने कराव्या लागणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेमधून पायउतार करायचे. त्याचवेळी त्यांना कसलीही सहानुभूती मिळू द्यायची नाही अशी रणनीती भाजपानं आखली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे भाजप शिवसेना युती तुटली. केवळ दोन जागांसाठी ते अडून राहिल्याचे अमित शाह म्हणाले होते.

कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची, हे भाजपचे मिशन आहे. त्यासाठी जे लोक कामाचे आहेत त्यांना सोबत घ्यायचे. याविषयी त्यांच्या मनात कसलेही दुमत नाही. आ. आशिष शेलार जर मुंबई महापालिकेसाठी उपयोगी ठरत असतील तर त्यांच्यावर ती जबाबदारी दिलीच पाहिजे. त्यांना मंत्री केले नाही तरी चालेल. ही स्पष्टता भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आहे

महापालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत भाजपानं शिवसेनेला जबरदस्त टक्कर दिली होती. शिवसेना-भाजपा यांच्यातील संख्याबळ अत्यंत कमी होते. अवघे २ नगरसेवक शिवसेनेचे जास्त निवडून आले होते.

२०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात शिवसेनेने भाजपाला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष सत्तेत आले त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपाला धक्का बसला. त्यामुळे आत्ताच्या महापालिका निवडणुकीत वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.