लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:09 PM 2024-07-18T15:09:00+5:30 2024-07-18T15:16:57+5:30
Mumbai Local Train Time Table : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे आता ऑगस्टमध्ये त्यांच्या मुख्य मार्गासाठी अद्ययावत वेळापत्रक सुरु करणार आहे. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे फेऱ्या वाढवण्याची सूचना केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट महिन्यापासून लागू होणाऱ्या या वेळापत्रकात लोकलच्या वेळांपासून ते फेऱ्यांपर्यंत मोठा बदल करण्यात आला आहे. लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
ऑगस्टपासून लागू होणाऱ्या वेळापत्राकानुसार, दादर स्थानकातून १० लोकल फेऱ्या परळ स्थानकातून अतिरिक्त २४ फेऱ्या सुरू होणार आहेत.
दादर स्थानकावरुन सोडण्यात येणाऱ्या १० फेऱ्यांमध्ये पाच अप आणि पाच डाऊन मार्गावरील फेऱ्या असणार आहेत. दादरमधील फलाट क्रमांक १०ची रुंदी वाढवल्यामुळे हे शक्य होणार आहे.
कल्याण-कसारासाठी आता दादर स्थानकातून लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळं सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलचा खोळंबा टाळण्यासही मदत होणार आहे.
दुसरीकडे, ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.