मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा By मोरेश्वर येरम | Published: January 29, 2021 01:30 PM 2021-01-29T13:30:59+5:30 2021-01-29T13:48:08+5:30
मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ती मुंबईची लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत आहे. पण यासाठी काही नियम आहेत. जाणून घेऊयात... मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होत आहे. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पण मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. हे नियम आपण जाणून घेऊयात..
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व सामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवास करता येणार नाही. याची विशेष नोंद सर्वांनी घ्यायला हवी.
सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंतच्या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्यांनाच केवळ लोकलने प्रवास करता येणार आहे.
राज्य शासनाकडून याआधीच मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलेला असल्यानं लोकल प्रवासावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं सांगितलं जात आहे.