आता घोड्यावरुन मुंबई पोलीस घालणार गस्त; 'या' ठिकाणी ठेवणार खास लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:10 PM2024-08-01T17:10:54+5:302024-08-01T17:22:43+5:30

मुंबईच्या रस्त्यांवर आता लवकरच मुंबई पोलीस घोड्यावरुन गस्त घातलाना दिसणार आहेत

मुंबईकरांना आता पुन्हा एकदा रस्त्यावर घोडे गस्त घालताना पहायला मिळणार आहे. कारण राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या बंद पडलेले अश्वदल पुन्हा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा हा प्रकल्प सुरू करून अश्वदलात १३ घोडे केले होते. त्यानंतर सुमारे चार वर्षांनी याला मंजुरी मिळाली. मात्र, आता १३ यापैकी फक्त दोनच घोडे शिल्लक आहेत.

त्यानंतर आता मुंबई पोलिसांसाठी ३० घोडे खरेदी केले जाणार आहेत. यासह सर्व सुविधा असलेला तबेलादेखील बांधण्यात येणार आहे. पोलिसांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण व घोड्यांचा आहार व निगा राखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

२६ जुलै रोजी, राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता दिली आणि अश्वदलाची पुनर्स्थापना करण्यासाठी ३६.५३ कोटी रुपयांचे बजेट आणि खर्चासाठी आणखी १.८८ कोटी रुपये मंजूर केले.

त्यानुसार मुंबई पोलीस आता ३० घोडे खरेदी करणार असून त्यांना मरोळ येथे कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निदर्शने आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी घोड्यावर बसवलेले पोलिस अधिक प्रभावी ठरणार आहेत.

“जेव्हा एखादा पोलिस घोड्यावर बसतो तेव्हा त्याला अधिकचा परिसर दिसतो आणि त्यामुळे पर्यटनस्थळांवर तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील गुन्हे कमी होण्यास मदत होते. जमलेल्या जमावाला पांगवण्यास देखील मदत करू शकते,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भारतातील कोलकाता, केरळ, चेन्नई यासारख्या शहरांत पोलिसांचे स्वतःचे अश्वदल आहे. मात्र, मुंबई पोलिस दलाकडे स्वतःचे अश्वदल नव्हते. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत पोलिसांचे अश्वदल कार्यरत होते. मात्र १९३२ मध्ये घोडेस्वार पथकाला ट्रॅफिक संबंधी काही मुद्द्यावरून बरखास्त करण्यात आलं होतं.