मुसळधार पावसाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस दोन दिवस बंद; 'या' गाड्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:42 PM2024-07-25T16:42:00+5:302024-07-25T16:46:30+5:30

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा परिणाम एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर धरला आहे. उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूरसह वांगणीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचल्याच सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकलसह पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम झाला आहे.

बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने २५ आणि २६ जुलै रोजी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईबून पुण्याकडून जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने ट्वीट करत तीन गाड्या रद्द केल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार तुमच्या प्रवासाच्या नियोजन करा आणि सुरक्षित राहा, असे मध्य रेल्वेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो, असेही रेल्वेने म्हटलं आहे.

२५ जुलै रोजी गाडी क्रमांक १२१२३ सीएसएमटी - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २६ जुलै रोजीसाठी गाडी क्रमांक १२१२४ पुणे - सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे

२५ जुलै रोजी मुंबईहून पुण्याला जाणारी गाडी क्रमांक १२१२५ सीएसएमटी - पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २६ जुलै रोजी पुण्याहून मुंबईला येणार गाडी क्रमांक १२१२६ पुणे - सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

गुरुवारी पुण्याला जाणारी गाडी क्रमांक १२१२८ पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर शुक्रवारी पुण्याहून मुंबईला येणारी गाडी क्रमांक १२१२७ पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.