Narayan Rane vs Shivsena: लाठीमार, धरपकड अन् नुसता 'राडा'... पाहा, राणेंच्या बंगल्याबाहेरचं धुमशान By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:10 PM 2021-08-24T13:10:26+5:30 2021-08-24T13:34:54+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई आणि राज्यात ठिकठिकाणी जोरदार राडा सुरू झाला आहे. नारायण राणेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईत राणेंच्या घराबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निर्दशनं केली.
युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणेंच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली गेली. यावेळी राणे समर्थक आणि युवासेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले.
दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामुळे जोरदार राडा सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिगेट तोडून राणेंच्या घराबाहेर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
पण यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. यात अनेक महिलांचाही समावेश होता.
संपूर्ण राज्यभर राणेंविरोधात ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलनं सुरू आहेत. तर राणेंच्या विधानाविरोधात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
नारायण राणे सध्या चिपळूणमध्ये असून त्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान मुंबईत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत.
पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये युवासेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याचंही वृत्त समोर आलं आहे. तर एक पोलिसही जखमी झाला आहे.
जुहू येथे युवासैनिकांसह आलेले वरुण सरदेसाई म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आमच्या देवावर हात उगारण्याची भाषा कुणी करत असेल तर ते युवासैनिक सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही शेकडो लाठ्या खाण्यास तयार आहोत.
सिंहाच्या गुहेत येऊन दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले होते. मात्र आम्ही सिंहाच्या गुहेसमोर नाही तर उंदराच्या बिळासमोर आलो आहोत, असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. एकीकडे नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरू आहे.
आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आली होती. आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचं नाही. ज्यांनी आव्हान दिलं ते आम्ही स्वीकारलं. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे, असंही सरदेसाई म्हणाले