नवऱ्याची नोकरी गेली, मग 'पाटील काकी'नं सुरू केला छोटा व्यवसाय; आज कोट्यवधींची कमाई! By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:24 PM 2022-08-02T16:24:44+5:30 2022-08-02T16:38:43+5:30
Patil Kaki Story: भारतात गेल्या काही वर्षात खूप मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एका बाजूला मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरू असताना दुसरीकडे स्टार्टअपचीही जोरदार चलती आहे. आज आपण अशाच एका स्टार्टअपनं घेतलेल्या कोट्यवधींच्या भरारीची माहिती जाणून घेणार आहोत. देशात अगदी छोट्या छोट्या स्टार्टअप उद्योगांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यातून अनेकांना रोजगार देखील प्राप्त होत आहे. स्टार्टअप उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. इतकंच नव्हे, तर गेल्या काही वर्षात स्टार्टअपमधून देशातील अनेकांची स्वप्न पूर्ण झाली आहेत. अनेकांनी आपल्या आवडीला व्यवसायाचं स्वरुप देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपली आवड ही आपली ओळख होऊ शकते आणि यातून कोट्यवधींचीही कमाई होऊ शकते याचं उत्तम उदाहरण मुंबईतील गीता पाटील यांनी यांचं आहे. गीता पाटील यांनी आपल्या हातातील चव घराघरात पोहोचवत आज कोट्यवधींचा उलाढाल असलेला व्यवसाय केला आहे.
गीता पाटील यांनी 'पाटील काकी' नावानं फूड स्टार्टअप सुरू केला आणि आज त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. २०१६ साली त्यांनी आपल्या स्टार्टअपला सुरुवात केली होती. यात त्या पारंपारिक महाराष्ट्रीय स्नॅक्स आणि मिठाई आपल्या घरातूनच विकू लागल्या होत्या.
गीता पाटील यांना जेवण बनवण्याची आवड त्यांच्या कुटुंबातूनच मिळाली आहे. त्यांनी आपल्या आवडीला व्यावसायिक स्वरुप दिलं. २०१६ साली त्यांच्या पतीची नोकरी गेली. यामुळे घरखर्च चालवणं खूप मुश्कील होऊन बसलं होतं. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी गीता पाटील यांनी पारंपारिक स्नॅक्स आणि मिठाई बनवण्याचा स्टार्टअप सुरू केला. याचं नाव त्यांनी 'पाटील काकी' असं ठेवलं.
आज कोट्यवधींची उलाढाल २०१६ साली अवघ्या काही रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू केलेला स्टार्टअप आज कोट्यवधींची उलाढाल करत आहे. पाटील काकी यांनी मोदक, पुरणपोळी, चकली, पोहे, चिवडा इत्यादी वस्तू बनवून त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. पाटील काकींच्या पदार्थांना चव होती आणि ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. सुरुवातीच्या दिवसातच पाटील काकी दरमहा १२ हजार रुपयांची कमाई करू लागल्या होत्या. आता यात वाढ होऊन व्यापार तब्बल १.४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पाटील काकी यांनी आपलं स्वप्न तर पूर्ण केलंच. पण त्यांनी आज अनेक महिलांना रोजगार दिला आहे. आज त्यांच्यासोबत २५ महिला काम करत आहेत. पाटील काकींसोबत काम करणाऱ्या महिला आपलं घर सांभाळून पाटील काकींना मदत करतात. नुकतंच देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही पाटील काकी यांची दखल घेतली होती. त्यांनी पाटील काकींचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांचं कौतुक केलं होतं.
गीता पाटील यांनी पाककला आपल्या आईकडूनच शिकली आहे. त्यांनी आपल्या आईला दररोज २० जणांचा टिफीन पॅक करताना पाहिलं आहे. लहान असताना मी माझ्या आईची छोटीशी हेल्पर होते असं गीता पाटील आज आईसोबतच्या आठवणी शेअर करताना आवर्जून सांगतात. आज 'पाटील काकी' यांच्या पदार्थांसाठी ३ हजाराहून अधिक ग्राहक आहेत आणि वर्षाला १ कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते.
गीता यांचा जन्म मुंबईचाच आणि लहानच्या मोठ्या देखील त्या मुंबईतच झाल्या. लग्नही मुंबईतच झालं. त्यामुळेच मुंबई हेच आपलं घर असल्याचं त्या सांगतात. लग्नानंतर आपण फक्त विलेपार्लेहून सांताक्रूझला शिफ्ट झालो असं त्या सांगतात. गीता यांचे वडील बीएमसीमध्ये काम करायचे आणि आई होम शेफ म्हणजेच टीफीन बनवून द्यायचं काम करायच्या. आता पतीची नोकरी गेल्यानंतर गीता यांनीही आईकडून प्रेरणा घेत तेच काम सुरू केलं.
सणांच्या वेळी फराळ बनवण्यापासून त्यांनी सुरुवात केली. आपल्या परिसरात मुस्लिम आणि कॅथलिक लोकही राहतात, त्यांना चकली किंवा पुरणपोळी असे महाराष्ट्रीय पदार्थ हवे असत त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. आज त्यांच्या व्यवसाय खूप मोठा झाला आहे. इतका की त्या दिवसभर यातच व्यग्र असतात. गीता पाटील यांना कामातून थोडा वेळ मिळाला की, कुटुंबासोबत वेळ घालवणे, नातेवाइकांशी गप्पा मारण्यात त्यांना मजा येते असं त्या सांगतात.
२०१६ ते २०२२ पर्यंत कोणत्याही ब्रँडशिवाय गीता आणि त्यांचे पती स्वत:च्या मेहनतीने हे घरगुती स्वयंपाकघर चालवत होतं. नंतर २०२१ मध्ये लॉकडाऊनच्या वेळी त्यांचा मुलगा विनीत याने व्यवसायात प्रवेश केला. त्याने ब्रँडिंग आणि मार्केटिंग समजून घेऊन आईला मदत केली. त्यानंतर 'पाटील काकीं'च्या नावाने कामाची नवी सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर व्यवसायाला प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं.
विनीतने म्हणजेच पाटील काकी यांच्या मुलाने १२ लाखांचा वार्षिक महसूल आज सुमारे १.४ कोटींवर आणला आहे. सांताक्रूझमध्ये जागा घेतली आणि आज त्यांनी २५ इतर महिलांना रोजगार दिला आहे. लोक निरोगी राहतील आणि आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या गोष्टी बनवायच्या आणि त्या लोकांना खाऊ घालायच्या असा गीता पाटील यांचा दृष्टीकोन आहे.