'जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय, महाराष्ट्रालाही मदत मिळणार' By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:03 PM 2021-05-20T13:03:14+5:30 2021-05-20T13:21:31+5:30
राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विनाशाचे थैमान घालणारे तौत्के चक्रीवादळ (Tauktae Cyclone) सोमवारी दुपारनंतर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही किलोमीटर अंतरापासून गुजरातकडे सरकले.
त्यावेळी ताशी 190 किलोमीटरहून अधिक वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी तडाखा दिला. या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
हजारो गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा करुन राज्याला 1000 कोटींची मदत जाहीर केली. त्यावरुन, विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी हे केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत का, सवाल अनेकांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
तसेच देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागालाही मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, गुजरात 1000 कोटींची मदत जाहीर केल्याने इतर राज्यांना मोदींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर होणाऱ्या आरोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. केंद्र सरकारने जी प्रेसनोट काढलीय, त्यामध्ये सर्वच बाधित राज्यांना मदत करणार असल्याचं स्पष्ट म्हटलंय.
तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाची सत्ता नाही, तरीही तेथील नेतेमंडळी का बोलत नाही. कारण, त्यांनी ती प्रेसनोट नीट वाचलीय. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्वच राज्यांना आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून मदत मिळणार आहे.
राज्याकडे एसडीआरएफ असतो, केंद्र सरकार एनडीआरएफकडून आपल्याला देत असतं. राज्य सरकारला हे सर्व माहिती आहे, तरी जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. केंद्र सरकार निश्चितच महाराष्ट्रालाही मदत करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
वादळामुळे गुजरातमध्ये 16 हजारांहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 40 हजार झाडे आणि 10 हजारांहून अधिक विजेचे खांब पडले आहेत. तौत्के चक्रीवादळात मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.