Pooja Chavan Case: '२-३ दिवसांत माझी हत्या होण्याची शक्यता'; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर!

By मुकेश चव्हाण | Published: March 3, 2021 08:11 AM2021-03-03T08:11:20+5:302021-03-03T11:36:49+5:30

Pooja Chavan Suicide Case: तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे.

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाबाबत दिवसेंदिवस अनेक नवा खुलासा होत असल्याचे दिसून येत आहे.

पूजाच्या मृत्यू प्रकरणात पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले होते. पूजाच्या आई-वडिलांना माजी मंत्री संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले असल्याचा धक्कादायक आरोप केला शांताबाई राठोड यांनी केला होता.

तसेच पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोटही शांताबाई राठोड यांनी केला होता.

यानंतर शांताबाई राठोड यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पूजाच्या वडीलांनी केला आहे.

शांताबाई राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कारस्थान शांताबाई राठोड यांनी रचले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम ५००, ५०१, ५०२ भादंवि व कलम ६६ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मंगळवारी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीत लहू चव्हाण म्हणाले की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. १ मार्च रोजी शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत, असं लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. आता २ ते ३ दिवसांत माझी देखील हत्या होण्याची शक्यता मला वाटत आहे. त्यामुळे माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई राठोड यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे.

माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर काल आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली होती.

पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात वानवडी पोलीस तपास करीत आहेत. अजूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पूजा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अंतिम अहवालात काय म्हटले आहे, असे प्रश्न विचारले. त्यावर आयुक्त गुप्ता हे केवळ हसून काहीही न बोलता पत्रकार परिषद संपवून निघून गेले.