Pooja Chavan Suicide Case: "संजय राठोडांचा राजीनामा घेतला, तर मुख्यमंत्र्यांना आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल" By मुकेश चव्हाण | Published: February 17, 2021 01:45 PM 2021-02-17T13:45:55+5:30 2021-02-17T14:39:53+5:30
Pooja Chavan Suicide Case: माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.
पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. संजय राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नारायण राणे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीत बसलेले मुख्यमंत्री घेणार नाहीत. कारण तसे केले तर अशाच एका जुन्या प्रकरणावरून आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राज्याच्या राजकारणात सद्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवले जात असून, भाजपाच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्यावर शिवसेना अद्याप बोलायला तयार नसून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा सरकार घेणार नाही असे भाकीत नारायण राणे यांनी केले.
संजय राठोड यांनी राजीनामा दिला तर आधीच्या सुशांत सिंग प्रकरणात आणखी एका मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागेल, अशी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नारायण राणे यांनी खरमरीत टीका केली.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे मंगळवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला.
महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून एकही आश्वासन ठाकरे सरकारने पूर्ण केले नाही. त्याचबरोबर या सरकार मधील अनेक नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत. आत्महत्या नसून ही हत्या असल्याची शक्यता नारायण राणे यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून एकप्रकारे पाठबळ देत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
दरम्यान, पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. ७ फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास तिने आत्महत्या केली होती.