Pooja Chavan Suicide Case: ...म्हणून संजय राठोड माध्यमांसमोर येत नाहीत; संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण By मुकेश चव्हाण | Published: February 16, 2021 04:42 PM 2021-02-16T16:42:47+5:30 2021-02-16T17:06:16+5:30
Pooja Chavan Suicide Case: सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहूनच झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात आहात म्हणून बेधुंद गोळीबार करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच या सर्व प्रकरणाचा शिवसेनेच्या प्रतिमेला कोणताही फटका बसणार नाही, असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरू होत्या.
या प्रकरणाच्या निष्पक्षपाती चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानूसार, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याबाबतचे सर्व वृत्त मातोश्रीवरील सूत्रांनी फेटाळून लावले आहे.
संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाची झाली. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड यांनी राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मत मांडलं आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
संजय राठोड यांच्या प्रसारमाध्यमांसमोर न येण्याच्या निर्णयाचे संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर का यावं, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सध्या पोलिसांकडून पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे संजय राठोड शांत बसून आहेत. अन्यथा पुन्हा संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येऊन दबाव आणतात, तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप केले जातील, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहूनच झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात आहात म्हणून बेधुंद गोळीबार करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच या सर्व प्रकरणाचा शिवसेनेच्या प्रतिमेला कोणताही फटका बसणार नाही, असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिलं आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. ७ फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास तिने आत्महत्या केली होती.