बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

By मोरेश्वर येरम | Published: January 23, 2021 06:57 PM2021-01-23T18:57:38+5:302021-01-23T19:46:31+5:30

मुंबईच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील कार्यक्रमात आज अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंना हात जोडून अभिवादन स्वीकारताना पाहिलं.

हाच तो क्षण...वेळ ६ वाजून २३ मिनिटं. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकाच मंचावरुन उपस्थितांचं हात जोडून अभिवादन स्विकारताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने राज्यातील मातब्बर नेते यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेकडून मोठ्या जल्लोषात बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलं. दक्षिण मुंबईत श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील मोक्याच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील महत्वाचे नेते व मंत्री यावेळी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांचा राज आणि उद्धव ठाकरे यांनी सन्मान केला. यावेळी शशिकांत वडके यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

एकाच मंचावर उपस्थित असलेल्या ठाकरे बंधूंमधील बंधू प्रेम यावेळी उपस्थितांना पाहायला मिळालं.

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंचावर काही मिनिटं बोलणं देखील झालं. राज यांच्या हाताच्या दुखापतीबाबत उद्धव यांनी विचारपूस केली असं दिसून आलं.

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतऱ्यासह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

दोन्ही हात उंचावून जनतेला अभिवादन करतानाची बाळासाहेब ठाकरे यांची चपखल कलाकृती शशिकांत वडके यांनी साकारली आहे.