राज ठाकरे सहकुटुंब 'वर्षा'वर जाणार; शिंदेंनी मंत्र्यांनाही स्नेहभोजनाला बोलावलं, बाप्पाचं दर्शन अन् दसऱ्याचं प्लानिंग? By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:57 AM 2022-09-06T11:57:01+5:30 2022-09-06T12:13:56+5:30
उद्धव ठाकरेंना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात राज ठाकरेही पाहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे. यात आज 'वर्षा'वर राज ठाकरे थेट सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहेत. तर मंत्र्यांनाही मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलं आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीची चढाओढ सुरू असल्याचं दिसून येत आहे. यातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात राज ठाकरेही पाहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे.
शिवाजी पार्कवर दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. पण यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीची परवानगी मागितली गेल्याचं सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे शिंदे गटाकडून दसरा मेळावा आयोजित केला गेला तर त्यात उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंना मैदानात उतरलं जाणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे आणि सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी राज ठाकरे जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण यासोबतच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या दसरा मेळाव्या बाबतच्या रणनीतीची चर्चा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आज मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यमंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्र्यांचं स्नेहभोजन आणि राज ठाकरेंची भेट याचं टायमिंग तर साधण्यात आलेलं नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या मंत्र्यांसह वर्षावर आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात दसरा मेळाव्याबाबतची रणनीती ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीत सर्व मंत्र्यांचं म्हणणं ऐकून पुढील भूमिका निश्चित केली जाऊ शकते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखत दिली होती. यातही शिंदे यांनी दसरा मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणाबाबतचं वृत्त थेट फेटाळून लावलेलं नाही. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे.
शिंदे गटाकडून बीकेसीमधील एमएमआरडीएच्या मैदानासाठीही दसऱ्याच्या दिवशी परवानगी मागितली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला तर त्याच दिवशी शिंदे गटाकून बीकेसीवर मेळावा आयोजित केली जाण्याची तयारी केली जात आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात राज ठाकरेंसोबतची वाढलेली जवळीक पाहता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट राज ठाकरेंना गळ घातली जाणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आज राज ठाकरे सहकुटुंब 'वर्षा'वर पोहोचणार आहेत. वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं ते दर्शन घेणार आहेत. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याचीही शक्यता आहे. राज ठाकरेंकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांच्या भेटींचा सिलसिला सुरू आहे.
राज ठाकरेंनी नुकतंच लालबागचा राजा, जीएसबी, गणेश गल्लीसह मुंबईतील महत्वाच्या गणेश मंडळांना भेट दिली आहे. तसंच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी यंदा गणरायाचं आगमन झालं होतं. यासाठी भाजपासह शिंदे गटातील आमदार बाप्पाच्या दर्शनासाठी 'शिवतीर्थ'वर पोहोचले होते.
स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरे यांच्या घरगुती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही रंगल्या होत्या. दरम्यान, त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. दसरा मेळाव्याबाबतचं वृत्त त्याभेटीनंतरच समोर आलं होतं. त्यात आज राज ठाकरे थेट 'वर्षा'वर पोहोचणार असल्यानं या चर्चेला आता अधिक बळ मिळालं आहे.