Pooja Chavan Case: "पूजा चव्हाणला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेमधील हे पहिलं पाऊल; आता हा विषय फक्त..." By मुकेश चव्हाण | Published: March 5, 2021 09:36 AM 2021-03-05T09:36:21+5:30 2021-03-05T09:43:26+5:30
The resignation of Sanjay Rathore is the first step in the process of getting justice for Pooja Chavan, said BJP leader Chitra Wagh: सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर समाजाची ढाल करून लढणाऱ्या महिलांचे आवाज दाबणाऱ्यांविरुद्धची हि लढाई आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) नाव आल्यानं शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आहे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता, परंतु ४ दिवस उलटले तरी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे पाठवण्यात आला नाही, याबद्दल विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.
अखेर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.
राज्य सरकार आणि संजय राठोड यांच्याविरोधात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. तसेच संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे मंजूरीसाठी उशीरा पाठवल्याने चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर गुरुवारी उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती मिळाली. पूजा चव्हाणला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेमधील हे पहिले पाऊल मी समजते. हा विषय फक्त एवढ्यापुरतां मर्यादीत नसून सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर समाजाची ढाल करून लढणाऱ्या महिलांचे आवाज दाबणाऱ्यांविरुद्धची हि लढाई आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितले.
तत्पूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, या ऑडिओ क्लिपमुळे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडली, संजय राठोड हे पूजाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांनी केला, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली. एकीकडे विरोधकांचा वाढता दबाव आणि दुसरीकडे संजय राठोड यांचे पूजाच्या मृत्यूनंतर १५ दिवस मौन बाळगणं, त्यामुळे या प्रकरणाने ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं, संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली.
पोहरादेवी गडावरील शक्तिप्रदर्शन, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव येणे, या सगळ्या गोष्टींमुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच सापडली, त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांनी नैतिकतेच्या आधारे हा राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाबाबत दिवसेंदिवस अनेक नवा खुलासा होत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोटही शांताबाई राठोड यांनी केला होता. यानंतर शांताबाई राठोड यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पूजाच्या वडीलांनी केला आहे.
शांताबाई राठोड यांनी आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ आपल्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कारस्थान शांताबाई राठोड यांनी रचले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम ५००, ५०१, ५०२ भादंवि व कलम ६६ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रार पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मंगळवारी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीत लहू चव्हाण म्हणाले की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. १ मार्च रोजी शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत, असं लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.
शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. आता २ ते ३ दिवसांत माझी देखील हत्या होण्याची शक्यता मला वाटत आहे. त्यामुळे माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई राठोड यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे.