पुन्हा झळाळलं रॉयल ऑपेरा हाऊस

By admin | Published: October 22, 2016 12:00 AM2016-10-22T00:00:00+5:302016-10-22T00:00:00+5:30

ग्रँट रोड चर्नी रोड गिरगाव या भागांमध्ये सिनेमागृहांची एक साखळीच होती त्यामध्ये ऑपेरा हाउस नव्याने सामील होत आहे. त्यामुळे जुन्या-नव्या पिढीच्या लोकांना एकत्र येऊन ऑपेरा मैफली ऐकायला येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. इतिहासाचं एक सुवर्णपान वर्तमानात नव्यानं सुरू झालं आहे...

अखेर त्यास २००८ साली मूर्त स्वरूप आले. या भव्य हाउसचा वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे त्याची कोणतीही तोडमोड किंवा त्याचा पुनर्विकास करता येणार नव्हता. त्यामुळे दुरुस्ती आणि सुशोभिकरणानेच त्याला मूळची झळाळी देण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईतील प्रसिद्ध स्थापत्यविशारद आणि पुरातन वास्तूंना संरक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या आभा नारायण लांबा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली.

१९५२ साली गोंडल संस्थानचे महाराजा विक्रमसिंहजी यांनी ऑपेरा हाउस घेतले. कालांतराने ८० च्या दशकानंतर सिंगल स्क्रीन बंद करण्यात आले. प्रेक्षकांची बदलती रुची आणि बदलत्या काळामुळे ऑपेरामध्ये होणारा व्यवसायही कमी होत गेला आणि अखेर १९९३ साली ते बंद करण्यात आले. बंद केल्यानंतर गोंडलच्या सध्याच्या राजेसाहेबांच्या म्हणजे ज्योतिंद्रसिंहजींच्या मनामध्ये ते पुन्हा सुरू व्हावे अशी प्रबळ इच्छा होती.

नाटकांबरोबर काही वर्षांनी येथे सिनेमे दाखवण्यात येऊ लागले. बऱ्याच सिनेमांचा नारळही याच ऑपेरा हाउसमध्ये फुटला. त्यातील भरपूर सिनेमांनी सिल्व्हर ज्युबिलीही पाहिली. काही सिनेमांचे चित्रीकरणही येथे झाले होते. मुघल-ए-आझम दो आंखे बारह हाथ हिमालय की गोद में पूरब और पश्चिम अमर अकबर अँथनी सारखे सत्तरीच्या दशकापर्यंतचे बॉलिवूड गाजवणारे चित्रपट येथे लावले गेले. पृथ्वीराज कपूर राज कपूर यांची नाटकासाठी ऑपेरा हाऊसला विशेष पसंती होती.

कोलकात्याचे मॉरिस बँडमन आणि जहांगीर फ्रेमजी कराका यांनी या ऑपेरा हाउसची सर्व संकल्पना मांडून ती तडीस नेली. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आणि युरोपीय नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ते केंद्र बनले. सुरुवातीच्या काळात येथे केवळ ऑपेराच होत असत मात्र नंतर इतर संगीत मैफली नाटकांनाही परवानगी देण्यात आली. गुजराथी पारशी मराठी रंगभूमीवरची नाटके येथे होऊ लागली.

१८९६ साली युरोपप्रमाणे मुंबईतही ऑपेरा हाउस असावे असा विचार सुरू झाला आणि चर्नी रोड परिसरामध्ये रॉयल ऑपेरा हाउसची बांधणी सुरू झाली. टप्प्याटप्प्याने इमारतीचे बांधकाम आतील फर्निचर आणि इतर कामे पूर्ण होत गेली. पण १९११ साली राजे पंचम जॉर्ज भारतभेटीवर आले असताना त्यांच्या हस्ते ऑपेरा उद्घाटनही करून घेण्यात आले. त्यानंतर इतर कामे सावकाश पूर्ण होत १९१६ साली सर्व ऑपेरा खऱ्या अर्थाने रसिकांच्या भेटीला तयार झाले. त्या अर्थाने यावर्षी ऑपेरा हाउसला शंभर वर्षे पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.

बरोक स्थापत्यशैलीतील या अजोड वास्तूने त्यामध्ये सादर होणाऱ्या गाण्यांनी नाटकांनी मुंबईकरांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवले होते. दक्षिण आशियातील एकमेव ऑपेरा हाउस अशी बिरुदावली सन्मानाने मिळविण्यासाठी ऑपेरा पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

चर्नी रोडचे भारतातील एकमेव ऑपेरा हाऊस दिमाखात उभे राहिले आहे. लाकडी जिने मखमली कारपेट आणि खुर्च्या शंभर वर्षांपूर्वीप्रमाणेच रोषणाई झुंबरे तिकीट विकणारी तीच जुनी खिडकी.. आपल्याला पुन्हा त्या जमान्यात घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे.

मावळत्या सूर्याच्या साक्षीने रंगत जाणाऱ्या संगीत मैफली आणि ऑपेरा हाऊस पाहण्यासाठी व्हिक्टोरियातून उतरणारी ब्रिटिश भारतीय युरोपीय पारशी मंडळी... दरवेळेस नव्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी जमणारा हा जमाना आता पुन्हा अवतरणार आहे.

भव्य स्टेज अर्धवर्तुळाकार सभागार दोन गॅलरी दोन्ही बाजूस साईड गॅलरीज आणि बरोक शैलीमध्ये उत्तम कोरीव काम केलेले खांब व भिंती यामुळे हे ऑपेरा हाउस त्या काळात सर्वांच्या पसंतीस उतरले. ऑपेरा हाउसचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खालच्या बाजूस ठेवण्यात आलेले सहा फॅमिली बॉक्सेस. या बॉक्समध्ये कोचावर बसून सर्व कुटुंबाला नाटकाचा ऑपेराचा आनंद घेता येत असे. आज अशी बॉक्सची सोय इतरत्र आढळत नाही.

ऑपेरा हाउसची इमारत ही चर्नी रोड परिसराची एक सांस्कृतिक ओळखच आहे. बरोक शैली आणि भारतीय व युरोपीय स्थापत्यशैलीचा सुरेख संगम या इमारतीच्या बांधकामामध्ये झाला आहे. स्थापत्यकला आणि संस्कृतीच्या उपासकांना अभ्यासासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे.

मागची जवळजवळ दोन दशके बंद असलेले हे ऑपेरा हाउस आता जुन्याच बाजासह पण नवी झळाळी घेऊन रसिकांसाठी खुले झाले आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बालगंधर्व यांच्या अजरामर गाण्यांच्या मैफली असोत वा पूरब और पश्चिममधील ‘भारत का रहने वाला हॅूँ’... किंवा मुघल-ए-आझममधले ‘जब प्यार किया तो डरना क्या’ असो.. नाटक ऑपेरा आणि सिनेमातील अशा एकाहून एक सरस गाण्यांनी मुंबईतील कलापूर्ण सभागृहाने मागचे शतक गाजवले. ते सभागृह म्हणजे रॉयल ऑपेरा हाउस. (छायाचित्र - दत्ता खेडेकर)