Sanjay Raut: संजय राऊतांना अटक का केली?; आता ईडीनेच सांगितली यामागील ३ महत्वाची कारणं..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:45 AM2022-08-01T11:45:29+5:302022-08-01T12:03:32+5:30

Sanjay Raut: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते.

सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता संजय राऊतांना ईडीने अटक केली.

ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊतांना आज दूपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे. संजय राऊतांच्या कोर्टातील सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असेल. मात्र संजय राऊत यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्याची कारणं ईडीने सांगितली आहेत. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असहकार, बेहिशेबी रोकड जप्त आणि गुन्हेगारी दस्तऐवज पुनर्प्राप्त/ संशयास्पद कागदपत्र या तीन कारणांमुळे संजय राऊतांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच ईडीचे अप्पर संचालक सत्यव्रत कुमार यांनी काल संजय राऊत यांच्या अटकेच्या मेमोवर स्वाक्षरी केली होती. आज ईडी कोठडीनंतर सत्यव्रत इतर ४ अधिकाऱ्यांसह राऊतांची अधिक चौकशी करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.