चिंचपोकळीत 'सेहत का श्रीगणेशा'; प्रसाद म्हणून दिला जातोय मोदकरूपी साबण By पूनम अपराज | Published: September 13, 2021 04:23 PM 2021-09-13T16:23:03+5:30 2021-09-13T16:52:37+5:30
Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि कोरोना काळात सतत दिला गेलेला हात स्वच्छ धुण्याचा संदेश चिंचपोकळीतील आनंद इस्टेट येथे राहणाऱ्या श्रावण घोडके या युवकाने आपल्या राहत्या घरी गणपतीच्या सजावटीतून दिला आहे.
सद्या कोरोनाचा महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोना महामारीच्या भयंकर काळात व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी बऱ्याच जणांनी लिंबू सरबताचे सेवन केले. आपल्या चिंचपोकळी, लालबाग परिसरातून लिंबू सरबत विक्रेते यांच्याकडून टाकून देण्यात आलेले १२०० ते १५०० लिंबाची सालं गोळा करून त्याचे सुकवून चूर्ण बनवण्यात आले. ही आवरणे सरसकट कचऱ्यात फेकली जातात, परंतु सद्य स्थितीत या सालीचे असलेले फायदे यंदाच्या या घरगुती गणेश सजावटीतून मांडण्यात आलेले आहे.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासूनच श्रवण आणि त्यांच्या मित्र मंडळींनी गणपती बाप्पासाठी अनोखी सजावट साकारण्याबाबत विचारविनिमय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ही अनोखी संकल्पना सुचली. या संकल्पनेतूनच प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक सजावट करण्यात आलेली आहे.
सजावटीतील ऋषीमुनी लिंबू पावडर, हळद, कापूर, चण्याचे पीठ, मक्याचे पीठ, मीठ, साबणाचे तुकडे यांचा मिश्रणातून साकारले आहेत. उत्सवानंतर ऋषीमुनी पाण्यात विसर्जन केल्यानंतर ते विरघळून त्यापासून नैसर्गिक हॅन्ड वॉश तयार करणार असून त्याचा पुनर्वापर करू शकतो. तसेच साकारलेली दीड फुटाची गणेशमूर्ती ही शाडू मातीची असून मूर्ती गिरगावातील मूर्तिकार आकाश कांबळे याने साकारलेली आहे. त्या मूर्तीमध्ये देखील लिंबू चूर्णाचा वापर करण्यात आलेला आहे. लिंबू चूर्ण नैसर्गिक पाणी स्वछ करण्याचे कार्य करते. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर आपोआपच मूर्तीमधील लिंबू चूर्ण पाणी स्वच्छ करण्याचे कार्य सुरु करेल.
कोरोनाच्या कालावधीमध्ये बाहेरून आल्यामुळे बाप्पाचा प्रसाद खाताना हाताची योग्य स्वछता न केल्यामुळे विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्याकरिता लिंबू पावडर, हळद, कापूर, चण्याचे पीठ, मक्याचे पीठ, मीठ, साबणाचे तुकडे या घटकांपासून मोदकरुपी साबण बनविण्यात आलेले आहेत. मोदकरुपी साबण घरी आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. तो साबण हात धुण्यासाठी वापर करावा व त्यानंतरच बाप्पाचा दुसऱ्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही उत्सवाची संकल्पना आहे.
या मोदकरूपी साबणासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कापडी पिशवी देखील दिली जाते. जेणेकरून हा मोदकरूपी साबण आपण कुठे घेऊन जाऊ शकतो. ह्या मोदकाने हात स्वच्छ केल्यामुळे कोरोना महामारीस आळा नक्कीच घालता येऊ शकतो.
हे मोदक खाण्यासाठी नाहीत. तसा स्पष्ट उल्लेख या मोदकाच्या आवरणावर केलेला आहे. या मोदकामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे मोदक कोणीही चुकूनही खाऊ शकणार नाही व त्याचा साबणाप्रमाणे सुगंध असल्यामुळे ते खाण्याची शक्यताच नाही, अशी अनोखी सजावट आपल्या पाहायला मिळेल श्रवणच्या घरी. श्रवणच्या घरी फक्त पाच दिवस बाप्पाचे आगमन झाले असून उद्या या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाईल