गुदमरून टाकतील, कानाचे पडदे फाडतील... असे फटाके टाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 10:35 AM2022-10-24T10:35:14+5:302022-10-24T10:42:29+5:30

मुंबई : कोणताही आवाज हा ८० डेसिबलच्या पुढे असेल तर तो आरोग्याला घातकच ठरतो. त्यात आता दिवाळीदरम्यान फोडल्या जाणाऱ्या जवळपास सगळ्याच फटक्यांचा आवाज हा १२० डेसिबलच्या आसपास आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनने केलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या चाचणीतूनदेखील ही बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी करताना पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करा.

फटक्यांच्या धुरासह आवाजामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन स्वयंसेवी संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.

फटक्याचा आवाज हा १२० डेसिबल पुढे असता कामा नये. चेंबूर येथील आरसीएफ मैदानावर फटक्यांची आवाजाची चाचणी करण्यात आली असून, यात कोणत्याही फटक्याचा आवाज १२० पुढे नाही. मात्र फटक्यांच्या आवाजाने, धुराने होणारे प्रदूषण होतेच, असे आवाज फाउंडेशनचे म्हणणे आहे.

1) अनेक धातू आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात. सल्फर, झिक, कॉपर, सोडियम, लीड, मॅग्नेशियम, केडनियमसारखे धातू वापरले जातात. 2) आवाज आणि रंग येण्यासाठी वापरलेल्या घटकातून वायुप्रदूषण होते. सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि नायात्रेट्सचा यात समावेश असतो. 3) आवाजाची तीव्रता ६० डेसिबलच्या वर गेल्यास कानाचे विकार होतात.

मुंबईकरांनी दिवाळी पर्यावरणस्नेही साजरी करण्यावर भर द्यावा. कारण दिवाळीदरम्यान होणाऱ्या आवाजाचा आणि धुराचा रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. शिवाय लहान मुलांनादेखील याचा त्रास होतो. त्यामुळे इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा, असे आवाज फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.