...आणि राणीच्या बागेत पुन्हा घुमली वाघाची डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:00 PM2020-02-13T16:00:01+5:302020-02-13T16:08:00+5:30

राणीच्या बागेत औरंगाबादहून दोन वाघ दाखल झाले आहेत. औरंगाबादेतल्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून त्यांना भायखळ्यातील राणीच्या बागेत आणण्यात आलं आहे.

त्या वाघांची नावं करिष्मा आणि शक्ती अशी असून, त्यांची आता विशेष काळजी घेतली जात आहे. औरंगाबादेतल्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील एका वाघिणीनं बछड्यांना जन्म दिल्यानं तिथली वाघांची संख्या वाढली आहे.

त्यामुळेच तिकडून दोन वाघ राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत. राणीची बाग आता अद्ययावत करण्यात आली असून, देश-विदेशातील जवळपास 100 पक्षी जवळून पाहता येणार आहेत.

राणीच्या बागेत बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, कासव हे प्राणीसुद्धा पाहायला मिळतात. पक्ष्यांसाठी तब्बल पाच मजल्याला मुक्त पक्षीविहार बांधण्यात आला आहे.

प्राण्यांसाठी काचेच्या भिंती असणारी अत्याधुनिक दालने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग अनेक वर्षांपासून मुंबईकरांचे आकर्षण ठरत आहे.

तीन वर्षांपूर्वी बागेत 'पेंग्विन'चे आगमन झाल्यानंतर मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.