आता मुंबईत मिळणार 'टोल फ्री' एन्ट्री, पण कोणाचे किती पैसे वाचणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:12 PM2024-10-14T17:12:28+5:302024-10-14T17:34:00+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचरसंहिता लागण्याआधी महायुती सरकारने मुंबईतील टोल नाक्यांसदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून लागू होणाऱ्या टोलमाफीमुळे सणासुदीच्या काळात मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे टोल नाक्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याचीही अपेक्षा आहे.

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. १४ ऑक्टोबर रात्री १२ वाजल्या पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे.

त्यानुसार, आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड-एलबीएस टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यांवर हलक्या वाहनांवर टोल आकारण्यात येणार नाही.

गेल्या कित्येक वर्षापासून टोलमाफीची मागणी करण्यात येत होती. अखेर हलक्या वाहनांसाठी टोलमाफीची घोषणा करण्यात आल्याने हजारो लोकांना फायदा होणार आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

जानेवारी २०२४ पासून या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना ४५ रुपये टोल आकरण्यात येत होता. दर तीन वर्षांनी या टोलनाक्यावर दरवाढ केली जात होती. मुंबईत असलेल्या पुलांच्या कामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी सरकारने हा टोल लागू केला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करताना सांगितले की, "मुंबईतील टोलिंग बूथवरील वाहतूक कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच यामुळे वेळ आणि इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. या सगळ्याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे."

मुंबईच्या सीमेवर असणाऱ्या पाच टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांना ही सूट देण्यात आली आहे. हलक्या मोटार वाहनांमध्ये कार (हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही), जीप, व्हॅन, ऑटो-रिक्षा, टॅक्सी, डिलिव्हरी व्हॅन आणि लहान ट्रक यांचा समावेश होतो. इतर सर्व वाहनांना ठरलेल्या रकमेनुसार टोल टॅक्स भरावा लागणार आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत दररोज सहा लाखांहून अधिक वाहने या टोल नाक्यावरुन जातात आणि त्यातील ८० टक्के हलकी वाहने असतात. तसेच टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी सुमारे ७०,००० अवजड वाहने आहेत. अवजड वाहनांचे एकूण वाहन वजन ७,५०० किलो पेक्षा जास्त असून त्यात ट्रक, ट्रेलर, टँकर आणि इतर मालवाहक वाहनांचा समावेश होतो.