Vasant More: वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:15 AM 2022-04-12T08:15:29+5:30 2022-04-12T08:24:24+5:30
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले. राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडले आहे. तर साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
वसंत मोरे मनसेत नाराजी झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनेचे वरून सरदेसाई, अशा विविध नेत्यांकडून मोरे यांना पक्षात सामील होण्याच्या ऑफर आल्या होत्या.
शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. वसंत मोरेंची निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत असल्याच्रेही ते म्हणाले होते.
वसंत मोरे यांना शिवतीर्थ वरून भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते. भेटीनंतर त्यांनी, मी माझ्या साहेबांसोबतच राहणार असल्याचे फेसबुकवर फोटो शेअर करत सांगितले आहे.
आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. !...जय श्रीराम...! असा मजकूर टाकून त्यांनी फोटो शेअर केला आहे. वसंत मोरेंनी काही तासांनंतर आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंसमवेत चर्चा करतानाचा फोटो दिसून येत आहे.
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले.
अरे इथे तर मी काहीच हरवले नाही. उगाचच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा!, असे ट्विट वसंत मोरेंनी केले असून राज ठाकरेंच्या आपण किती जवळचे आहोत, हेही त्यांनी या पोस्टमधून सांगितलंय.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यभरात टीका - टिप्पणीचे सत्र सुरु झले होते. पुण्यातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसू लागले होते. वसंत मोरे यांनी सुद्धा त्या भाषणानंतर अडचणीत आल्याचे सांगितले होते. त्यांनी माध्यमांसमोर येऊन अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले. इतर विरोधी पक्षांकडून मोरे यांना पक्षप्रवेशाची निमंत्रण देण्यात आली. त्यावेळी मोरे याबाबत राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते.
पण शिवतीर्थवरून कुठलीही सूचना अथवा निमंत्रण येत नव्हते. त्यामुळे वसंत मोरेंना पूर्णपणे अडकल्यासारखे वाटू लागले. अखेर आज राज ठाकरेंशी भेट झाल्यावर त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.