बुलडाणा जिल्हा : ५१ गावांतील पाणी पुरवठा योजना बनल्या शोभेच्या वास्तू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:48 PM2018-01-11T23:48:14+5:302018-01-11T23:48:27+5:30
डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून, १ ते ६ जानेवारीदरम्यान सहा दिवसांत ५८ गावांना भेटी देऊन तेथील गावकर्यांशी संवाद साधीत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला असून, १ ते ६ जानेवारीदरम्यान सहा दिवसांत ५८ गावांना भेटी देऊन तेथील गावकर्यांशी संवाद साधीत शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेचे विदारक चित्र जाणून घेतले.
जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सहा दिवसांत ५८ गावांपैकी जवळपास ५१ गावांमध्ये गावकर्यांना नळ योजनेद्वारे पाणीच मिळत नसल्याचे दिसून आले, तर ६ जानेवारी रोजी सुबोध सावजी यांनी डोणगाव येथील साडेचार कोटींच्या नळ योजनेची पाहणी केली. यावेळी योजनेचा केवळ सांगाडा उभा होता, तर नळ योजनेतून पाणी येत नव्हते. ३५ वर्षांपूर्वीच्या जुन्या नळ योजनेतून महिन्यात चार वेळा डोणगावला पाणी मिळत असून, साडेचार कोटी रुपये खचरूनही अधिकार्यांच्या भ्रष्टाचारामुळे डोणगावला पाणी नाही व वरून वाढीव योजनेची मागणी या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सायंकाळी ५ वाजता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आठवडी बाजरात सभा घेऊन जनतेला अधिकार्यांनी प्रत्येक गावात पाणी पुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देऊन जनतेचे हाल पाण्याअभावी कसे होत आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जळगाव जामोद, संग्रामपूर या भागातील दौरा करणार असल्याचे सांगून समाजकारणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते शैलेश सावजी, नामदेव काळे, अबरार खान मिल्ली, जितेंद्र अंबेकर, रहीम खान, उस्मान शाह, श्याम इंगळेंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश सावजी यांनी डोणगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेची माहिती देऊन या गावात वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नळ योजनेला पाणी नसताना ही पाइपलाइन खोदण्यात आली. एवढा मोठा भ्रष्टाचार असताना या योजनेसाठी वाढीव पैसा मागण्यात आला. हा कशासाठी ३0 वर्षांपूर्वीच्या योजनेतून महिन्यात एकदा पाणी मिळते, अशी माहिती दिली.