देशात स्थिर सरकार येणार अन् राजा कायम राहणार; भेंडवळ घटमांडणीचं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:55 AM2019-05-08T07:55:17+5:302019-05-08T07:58:46+5:30
साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे.
भेंडवळ - साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत. त्यामुळे राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तसेच घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असंही भाकीत मांडण्यात आलं.
भेंडवळने पिकांबाबत असा अंदाज वर्तवला की, अंबाळी - मोघम, रोगराई नाही. कापूस - मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल. ज्वारी - पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही. गहू - पीक मोघम स्वरुपाचे राहिल. तांदूळ - मोघम उत्पादन होईल. तूर - पीक चांगलं राहिल. मूग - मोघम उत्पादन राहिल. उडीद - सर्वसाधारण उत्पादन राहिल. तीळ - मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल. भादली - रोगराई शक्य. बाजरी - उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल. हरभरा - सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील असा अंदाज आहे.
गटातील चारा-पाण्याची प्रतीक असलेली चांडोली कोरडी गायब आहे. त्यामुळे भीषण चारा टंचाई यावर्षी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी गुराढोरांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गटातील घागरीवर असलेली पुरी गायब आहे त्याचा अर्थ पृथ्वीवर अनेक संकटे येतील, सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य. चारा-पाण्याची टंचाई येईल तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल आर्थिक ताण देशावर येईल. परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. परंतु त्याला मात्र आपले संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल अशा प्रकारे एकंदर आजची भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तविली आहे. ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्यासह लोकप्रतिनिधीसह पंचक्रोशीतून हजारो शेतकरी येथे उपस्थित होते.
Video: यंदा कमी पावसाची शक्यता, नैसर्गिक आपत्तीचेही संकट, भेंडवळची भविष्यवाणी https://t.co/J3FRJ3pW6s
— Lokmat (@MiLOKMAT) May 8, 2019