आॅक्टोबरच्या प्रत्येक रविवारी होणार मतदार नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 06:51 PM2018-10-05T18:51:25+5:302018-10-05T19:01:22+5:30
नव मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने आॅक्टोबर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
पुणे : नव मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने आॅक्टोबर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान नोंदणी बरोबरच पत्ता आणि नावातील बदल देखील मतदारांना करुन घेता येतील. या शिवाय महाविद्यालयात येखील प्रत्येक मंगळवारी मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या ३० आॅक्टोबर पर्यंत छायाचित्रावर आधारीत मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. ज्या मतदारांची १ जानेवारी २०१९ रोजी पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार नोंदणी करता येईल. आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी म्हणजेच दिनांक ७, १४, २१ आणि २८ आॅक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिम दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदार नोंदणीचे अर्ज वाटण्यात येतील. तसेच भरलेले अर्ज स्वीकारले देखील जाणार आहेत. त्याचप्रमाणे १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक मंगळवारी विशेष मोहिम घेण्यात येण्यात येईल. अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे.
-------------
मतदार मोहीमेसाठी महाविद्यालयांची घेणार मदत
जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढावी आणि ९ ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक विषयक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचाºयांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.